इशा, वरुण सुवर्णासह ऑलिम्पिकसाठी पात्र; पहिल्याच दिवशी भारताला दोन सांघिक जेतेपदांसह सहा पदके

जकार्ता येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत पिस्तूल आणि रायफल प्रकारातील ऑलिम्पिक कोटासाठी चढाओढ सुरू आहे.
इशा, वरुण सुवर्णासह ऑलिम्पिकसाठी पात्र; पहिल्याच दिवशी भारताला दोन सांघिक जेतेपदांसह सहा पदके

जकार्ता : १९ वर्षीय इशा सिंग आणि २० वर्षीय वरुण तोमर या दोघांनी सोमवारी आशियाई पात्रता नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदकाचा निशाणा साधून पॅरिस ऑलिम्पिक २०२४चे तिकीट पक्के केले. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने दोन सांघिक सुवर्णांसह एकंदर ६ पदके पटकावली.

जकार्ता येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत पिस्तूल आणि रायफल प्रकारातील ऑलिम्पिक कोटासाठी चढाओढ सुरू आहे. भारताच्या १५ नेमबाजांनी आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवलेली असून यामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठीही भारताचे १५ नेमबाज पात्र ठरले होते. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक रंगणार असून यंदा भारताला प्रथमच पदकांचे दशक गाठण्याची सुवर्णसंधी आहे.

दरम्यान, सोमवारी इशाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात २४३.१ गुणांसह सुवर्ण काबिज केले. पाकिस्तानची किश्मला तलत (२३६.३) आणि भारताची रिदम सांगवान (२१४.५) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची मानकरी ठरली. इशा व रिदम यांनी त्यानंतर सुरभी रावच्या साथीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यांनी १,७३६ गुणांची कमाई केली. इशाने गतवर्षी जागतिक स्पर्धेत १० आणि २५ मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात वरुणने २३९.६ गुणांसह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. भारताच्याच अर्जुन चीमाने २३७.३ गुणांसह रौप्य, तर मोंगोलियाच्या देवाखू इख्तावनने २१७.२ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. त्यानंतर वरुण, अर्जुन व उज्ज्वल मलिक या भारतीय त्रिकुटाने १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यांनी १,७४० गुण मिळवले. इराण व कोरियाचे संघ दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले. वरुण हा माजी कनिष्ठ जगज्जेता आहे. मंगळवारी १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचे नेमबाज पदकासाठी दावेदारी पेश करतील.

हे नेमबाज आतापर्यंत पात्र

रुद्रांक्ष पाटील, भोवनीश मेंदिराता, स्वप्निल कुसळे, अखिल शेरॉन, मेहुली घोष, सिफ्ट कौर सामरा, राजेश्वरी कुमारी, सरबजोत सिंग, अर्जुन बबुता, तिलोत्तमा सेन, मनू भाकर, अनिष भानवाला, श्रियांका सडंगी, वरुण तोमर, इशा सिंग.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in