दिव्यांश पनवारचा विश्वविक्रम! आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

दिव्यांशने एकदाही १०पेक्षा कमी गुण मिळवले नाहीत तसेच त्याने चौथ्या आणि सहाव्या प्रयत्नांत १०.९ गुणांची कमाई केली.
दिव्यांश पनवारचा विश्वविक्रम! आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा
Published on

कायरो : भारताचा ऑलिम्पियन दिव्यांश सिंग पनवार याने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रविवारी दमदार कामगिरी करत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात विश्वविक्रमाला गवसणी घातली.

२१ वर्षीय दिव्यांशने इजिप्त इंटरनॅशनल ऑलिम्पिक सिटी शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षीय चीनच्या शेंग लिहाओ याने आशियाई क्रीडा स्पर्धेत रचलेला २५३.३ गुणांचा विक्रम मागे टाकला. दिव्यांशने २५३.७ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले.

पात्रता फेरीत ६३२.४ गुणांची कमाई करत त्याने अव्वल स्थान प्राप्त केले होते. त्यानंतर अंतिम फेरीतही त्याने याच कामगिरीची पुनरावृत्ती करत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. रौप्यपदक पटकावणारा इटलीचा डॅनी सोलाझो त्याच्यापेक्षा १.९ गुणांनी मागे होता. दिव्यांशने एकदाही १०पेक्षा कमी गुण मिळवले नाहीत तसेच त्याने चौथ्या आणि सहाव्या प्रयत्नांत १०.९ गुणांची कमाई केली.

“बऱ्याच कालावधीनंतर सुवर्णपदक पटकावल्याचा आनंद होत आहे. बराच काळ मी चांगली कामगिरी करत असतानाही, पदकापर्यंत पोहोचता येत नव्हते. या पदकामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे,” असे दिव्यांशने जेतेपदानंतर सांगितले. सर्बियाच्या लॅझर कोव्हासेव्हिच याने कांस्यपदक प्राप्त केले. भारताच्या अर्जुन बाबुता याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील दिव्यांशचे हे पाचवे सुवर्ण तर दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. या स्पर्धेत आतापर्यंत भारताने दोन सपवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in