पंड्याच्या रक्षणासाठी मुंबई पोलीस रिंगणात

मुंबईविरुद्ध सर्वाधिक धावा फटकावल्यानंतर सनरायजर्सच्या चाहत्यांनीही पंड्याला टार्गेट केले. वानखेडे स्टेडियमवर सोमवारी मुंबईचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार असून रोहित शर्माच्या समर्थनार्थ मुंबईकर चाहतेसुद्धा हार्दिकला डिवचणार, हे निश्चित आहे. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.
पंड्याच्या रक्षणासाठी मुंबई पोलीस रिंगणात

मुंबई : गेल्या वर्षी रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद टाकून ते हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आल्यानंतर पंड्याला मैदानावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये चाहत्यांनी पंड्याची हुर्यो उडवली होती. त्यानंतर आता त्याच्या रक्षणासाठी मुंबईचे पोलीस सरसावले आहेत.

हार्दिक पंड्याला चाहत्यांच्या रोषापासून सावरण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आता मुंबई पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे. सलामीच्या सामन्यात अहमदाबादच्या मैदानावर गुजरातच्या चाहत्यांनी पहिल्यांदा हार्दिक पंड्याला टीकेचे लक्ष्य केले. त्यानंतर मुंबईविरुद्ध सर्वाधिक धावा फटकावल्यानंतर सनरायजर्सच्या चाहत्यांनीही पंड्याला टार्गेट केले. वानखेडे स्टेडियमवर सोमवारी मुंबईचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार असून रोहित शर्माच्या समर्थनार्थ मुंबईकर चाहतेसुद्धा हार्दिकला डिवचणार, हे निश्चित आहे. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. एमसीएने तगडी सुरक्षाव्यवस्था ठेवली असून मुंबईतील चाहत्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. पंड्याला ट्रोल करणाऱ्या किंवा त्याचा मानसिक छळ करणाऱ्या प्रत्येकाला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले जाईल. त्यानंतर त्या चाहत्यांना स्टेडियमबाहेर काढण्यात येईल, असे एमसीएच्या सूत्रांकडून समजते. त्यामुळे पंड्याला लक्ष्य करणाऱ्या चाहत्यांना पकडण्याचे आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर येऊन ठेपले आहे.

logo
marathi.freepressjournal.in