कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे - माजी कर्णधार मिताली राज

२८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे - माजी कर्णधार मिताली राज

कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी तयारी करणे खूप महत्त्वाचे आहे. चांगली तयारी आणि योग्य रणनीती घेऊन मैदानात उतरल्यास पदक जिंकण्याची चांगली संधी असते, असे मत भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजने व्यक्त केले. आपल्या मुली तयारी करूनच मैदानात उतरतील, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.

येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने महत्त्वपूर्ण विधान केले.

१९९८च्या हंगामात क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता; मात्र त्यानंतर पुन्हा या स्पर्धेत क्रिकेट खेळवणे शक्य झाले नाही. आता प्रथमच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

मितालीने गेल्या महिन्यात क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या ती तिच्या आयुष्यावरील ‘शाबाश मितू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानिमित्त कोलकात्यात असताना तिने भारतीय महिला संघ आणि आगामी राष्ट्रकुल स्पर्धांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाबद्दल मिताली म्हणाली, अष्टपैलू हरमनप्रीतकडे भारताला आघाडीवर नेण्याचा पुरेसा अनुभव आहे. ती २०१६ पासून टी-२० संघाचे नेतृत्व करीत आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच श्रीलंकेला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे.

भारताचा ‘अ’ गटात समावेश झाला आहे. भारताचा पहिला सामना २९ जुलैला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतासोबत अ गटामध्ये पाकिस्तान आणि बार्बाडोस हे देखील आहेत. क्रिकेटचा उपांत्य सामना ६ ऑगस्ट तर अंतिम सामना ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in