
क्रीडा प्रतिनिधी/मुंबई
ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर स्वत:चे नाव एखाद्या स्टँडला देण्यात येणे, ही माझ्यासाठी फारच अभिमानास्पद बाब आहे. ही भावना मी मोजक्या शब्दांत मांडू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली.
२६ मेपासून वानखेडे स्टेडियमवरच सुरू होणाऱ्या टी-२० मुंबई लीगच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमासाठी रोहित उपस्थित होता. टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी रोहितला चेहरा (फेस ऑफ सीझन थ्री) म्हणून नेमण्यात आले आहे. या लीगच्या निमित्ताने रोहितने अनेक आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, तसेच अपेक्स कौन्सिल आणि लीग गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य तसेच संघ चालक उपस्थित होते. या कार्यक्रमात एमसीएने दोन नवीन संघांचीही घोषणा केली. तसेच रोहितच्या उपस्थितीत चषकाचे अनावरण करण्यात आले.
एमसीएच्या आयोजनात ही लीग सहा वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा परतत आहे आणि तिसऱ्या पर्वाला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामध्ये २,८०० हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ही लीग मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेट प्रतिभेसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून किती महत्त्वाची आहे, हे यावरून स्पष्ट होते.
मुंबईच्या प्रसिद्ध मैदांवरून आपल्या प्रवासाला सुरुवात करून भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार बनलेला रोहित शर्मा हा मुंबईच्या समृद्ध क्रिकेट वारशाचा परिपूर्ण प्रतीक आहे. स्थानिक मैदानांपासून जागतिक स्तरापर्यंतचा त्याचा प्रवास आजही जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देतो आणि मुंबई क्रिकेटची ओळख ठरणाऱ्या प्रतिभा व जिद्देचा ठोस पुरावा आहे.
“टी-२० मुंबई लीगसाठी रोहित शर्माची तिसऱ्या पर्वाचा चेहरा म्हणून घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि प्रवास मुंबई क्रिकेटच्या जिद्द, चिकाटी, मेहनत आणि महत्त्वाकांक्षा या मूलभूत मूल्यांचं प्रतीक आहे. त्यांचा लीगसोबतचा सहभाग केवळ युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देणार नाही, तर लीगची प्रतिष्ठाही वाढवेल. त्याचबरोबर टी-२० मुंबई लीग कुटुंबात दोन नवीन फ्रँचायझी चालकांचे स्वागत करताना आम्ही तितकेच उत्साहित आहोत. विविध भागधारकांकडून वाढत असलेल्या रसशीतून, आमचे उद्दिष्ट म्हणजे मुंबईतील प्रतिभावान खेळाडूंना आणखी मोठं व्यासपीठ देणे,” असे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.