लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?

सोशल मीडियामुळे कधी कोणाचे नशीब चमकेल हे काही सांगता येत नाही. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे इजाज सावरिया. इन्स्टाग्राम रिल्सच्या जोरावर त्याला थेट आयपीएल लिलावात एन्ट्री मिळाली आहे.
लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?
लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?
Published on

मुंबई : इंग्लंडचा दिग्गज लेगस्पिनर आदिल रशीदने एका नवोदित गोलंदाजाच्या इन्स्टाग्राम रील्सवर प्रतिक्रिया दिली…अन् त्या तरुणाचं आयुष्यच बदलून गेलं. काही महिन्यांपूर्वी मोजक्या शेकडो व्ह्यूजपर्यंत मर्यादित असलेल्या इझाझ सावरियाच्या रील्स आज सहज हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. इतकंच नव्हे, तर इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या लिलावात त्याचं नावही आता अधिकृतपणे समाविष्ट झालं आहे.

थोड्यावेळापूर्वीच अबू धाबी येथे आयपीएल मिनी लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावात, २० वर्षीय सावरियाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तो अनकॅप्ड स्पिनर्सच्या चौथ्या आणि अंतिम सेटमध्ये क्रमांक २६५ वर आहे. विशेष म्हणजे, इझाझने आजवर कधीही प्रोफेशनल क्रिकेट खेळलेले नाही-तरीही तो केवळ सोशल मीडियावरून व्हायरल होऊन IPL लिलावापर्यंत पोहोचला आहे.

इझाझचा संघर्षमय प्रवास

इझाझचा बालपण उत्तर कर्नाटकातील बीदर या छोट्या शहरात गेलं. “मी एअरफोर्स कुटुंबातून आलो आहे. माझे वडील सध्या गोरखपूरमध्ये २७व्या स्क्वॉड्रनमध्ये कार्यरत आहेत,” असं इझाझ सांगतो. २०१७ मध्ये त्याने येथील विजय क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला तो वेगवान गोलंदाज होता, मात्र प्रशिक्षकांनी त्याला लेगस्पिनवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तीन वर्षे प्रयत्न करूनही अंडर-१५ संघात संधी न मिळाल्याने त्याने २०२२ मध्ये राजस्थानकडे मोर्चा वळवला. “कोविडनंतर मला वाटलं, इथे पुढे जाणं खूप अवघड आहे. म्हणून जयपूरला स्थलांतर केलं,” असे तो म्हणतो.

...म्हणून इंस्टाकडे वळाला

जयपूरमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत असताना संस्कार क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षक सुरेंद्र सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव सुरू केला. राठोड यांनी यापूर्वी भारताच्या अंडर-१९ वर्ल्डकप विजेत्या संघातील कमलेश नागरकोटी यांना प्रशिक्षण दिलं आहे. “पहिली दोन वर्षे फार कठीण होती. मी जिल्हा संघाचा भाग होतो, पण मला खेळण्याची संधी मिळाली नाही. गेल्या वर्षीही मला संधी देण्यात आली नाही. तेव्हाच मी वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली", असे इझाझ सांगतो.

इन्स्टाग्राममुळे टर्निंग पॉइंट

तो वेगळा मार्ग म्हणजे इन्स्टाग्राम. “सरावानंतर रोज एक रील शूट करून पोस्ट करायचो. सुरुवातीला फार अपेक्षा नव्हत्या. पण सातत्य ठेवलं, असं तो सांगतो. त्याच्या आयुष्यात खरा टर्निंग पॉइंट तेव्हा आला, जेव्हा या वर्षीच्या सुरूवातीला आदिल रशीदने त्याच्या रील्सवर कमेंट करायला सुरुवात केली. "आमचे नीट बोलणे झाले नाही, पण इन्स्टाग्रामवर मेसेजद्वारे संपर्क झाला", असे तो म्हणाला. “त्याने (राशिद) अनेक रील्सवर प्रतिक्रिया दिली. मेसेजमध्ये माझ्या गोलंदाजीचं कौतुक केलं. त्यानंतर आत्मविश्वास प्रचंड वाढला,” असं इझाझ म्हणतो. त्यानंतर व्ह्यूज वाढले, फॉलोअर्स झपाट्याने वाढू लागले आणि क्रिकेट विश्वाचं लक्ष त्याच्याकडे वळलं.

व्हायरल झालेले व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या स्काऊट्सपर्यंत पोहोचले. पंजाब किंग्सचे तत्कालीन बॉलिंग कोच सुनील जोशी यांनीही त्याची दखल घेतली. "चेन्नई सुपर किंग्सने माझ्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी दोन-तीनदा बोलणं झालं. नंतर सुनील जोशी सरांनी माझी रील पाहिली आणि माझा नंबर मागितला आणि त्यानंतर पंजाब किंग्सने मला लखनौमध्ये ट्रायल्ससाठी बोलावले. त्यांनी माझी गोलंदाजी पाहिली, कागदपत्रांची पडताळणी झाली आणि IPL लिलावासाठी माझं नाव भरलं," असे तो सांगतो.

इझाझला स्वतःच्या प्रवासाचं वेगळेपण जाणवतं. “असं आधी कुणासोबत झालं नाही. कदाचित मी पहिलाच खेळाडू असेन जो सोशल मीडियावरून थेट IPL लिलावापर्यंत पोहोचतोय, आता अनेक जण माझ्यासारख्या रील्स बनवत आहेत. एक नवा ट्रेंड सुरू झाला, याचं समाधान आहे," असे तो अभिमानाने म्हणतो.

रवी बिश्नोई आदर्श, धोनीचा मोठा चाहता
“माझ्या प्रशिक्षकांनी माझ्या तंत्रात, व्हेरिएशन्समध्ये खूप सुधारणा केली,” असे तो सांगतो. आदर्श खेळाडू म्हणून तो रवी बिश्नोईकडे पाहतो. MS धोनीचा तो मोठा चाहता आहे. “लहानपणापासून CSK ला सपोर्ट करतो. धोनी माझा हिरो आहे. पण संधी मिळाली, तर कोणत्याही संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.”

आई-वडिलांसाठी घराचं स्वप्न

इझाझ आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याचाही उल्लेख करायला विसरत नाही. विशेषतः वडील आणि मोठ्या बहिणीबद्दल. पुढे तो, “माझ्या प्रशिक्षकांनी माझ्या तंत्रात, व्हेरिएशन्समध्ये खूप सुधारणा केली,” असे सांगतो. तर, “माझ्या आई-वडिलांसाठी, स्वतःच्या पैशातून एक घर बांधायचं. एवढंच माझं सर्वात मोठं स्वप्न आहे, ” असे तो म्हणतो.

logo
marathi.freepressjournal.in