
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धची टी-२० सामन्यांची मालिकेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांचे पुनरागमन झाले. दुखापतग्रस्त जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कप झाल्यानंतरच संघ जवळपास ९५ टक्के निश्चित झाला असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळलेल्या संघात फारसा बदल नाही. भारतीय संघ ५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने भरपूर प्रयोग केले होते. हे प्रयोग करण्यामागे खेळाडूंची विश्वचषकासाठी चाचपणी घेणे, हे एकमेव ध्येय असल्याचे सांगितले जात होते. भारतीय संघाने गेल्या नऊ महिन्यांमध्ये तब्बल सात कर्णधारही बदलले. आता भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषकासाठी अष्टपैलू खेळाडूंवर भारतीय निवड समितीने जास्त भर देण्याचे ठरविले आहे. अष्टपैलू खेळाडू हे संघासाठी बाराव्या खेळाडूचे काम करतात, असा निवड समितीचा दृष्टिकोन आहे. हार्दिक पंड्याने हे आशिया चषक स्पर्धेत सिद्ध केले होते. रवींद्र जडेजा हा हुकमी अष्टपैलू खेळाडू गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने टी-२० विश्वचषकात खेळणार नाही. याबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच बीसीसीआयने स्पष्ट निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा टी-२० मालिकेसाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.