थुंबा : जय बिस्ता (१०० चेंडूंत ७३ धावा) आणि भूपेन लालवाणी (१७९ चेंडूंत ८८ धावा) या सलामीवीरांनी दमदार अर्धशतके झळकावली. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत केरळसमोर विजयासाठी ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तिसऱ्या दिवसअखेर केरळने दुसऱ्या डावात बिनबाद २४ धावांपर्यंत मजल मारली आहे.
सेंट झेव्हियर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ब-गटातील या लढतीत अखेरच्या दिवशी केरळला विजयासाठी ३०३ धावांची आवश्यकता असून त्यांचे सर्व फलंदाज शिल्लक आहेत. रोहन कुनुम्मल आणि रोहन प्रेम दोघेही प्रत्येकी १२ धावांवर खेळत आहे. त्यामुळे केरळ मुंबईला सलग तिसरा विजय मिळवण्यापासून रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तत्पूर्वी, मुंबईचा दुसरा डाव रविवारी ३१९ धावांत आटोपला. पहिल्या डावात ७ धावांची निसटती आघाडी घेणाऱ्या मुंबईसाठी दुसऱ्या डावात जय व भूपेनने १४८ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर प्रसाद पवार (३५), शम्स मुलाणी (३०), मोहित अवस्थी (३२) यांनीही उत्तम योगदान दिले. कर्णधार अजिंक्य रहाणे (१६) व शिवम दुबे (१) अपयशी ठरले. जलज सक्सेना व श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी ४ बळी मिळवले.