जय श्रीराम

आगामी आशिया कप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतातील श्रीरामाची मदत घेण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने घेतला
जय श्रीराम

संयुक्त अरब अमिरातीमध्ये येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट २०२२ स्पर्धेसाठी बांगलादेश चक्क ‘श्रीरामा’ची मदत घेणार आहे, म्हणे! आशियात क्रिकेटचा बादशहा होण्याचे बांगलादेशने गंभीरपणे मनावर घेतलेले दिसते. म्हणूनच की काय, त्यांना रामनामही आठवले आणि रामनामाचे महत्त्वही उमगले की काय, राम जाणे!

अनेक श्रद्धाळूंच्या दृष्टीने साक्षात रावणाच्या तावडीतून सीतामाईला सोडविण्यासाठी सागर ओलाडण्यास सेतू बांधताना दगडांनाही पाण्यावर तरंगविणारे हे सामर्थ्यशाली नाम! अगदी लोकशाही राज्यव्यवस्थेतही सत्तारूढ होण्यासाठी अपेक्षित ईप्सित साध्य करून देणारे हे हमखास यशप्राप्तीचे आधुनिक काळातील आध्यात्मिक महाशक्तीशाली अस्त्रच जणू! त्यामुळे आशियात क्रिकेटचा सम्राट होण्यासाठी रामनामाचा आठव होताच भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू श्रीधरन श्रीराम यांचे नाव बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या मनात आले असावे, कदाचित. भारतातील सद्य राजकीय चित्रावरूनही त्यांनी बोध घेतला असण्याचा तर्क व्यक्त करण्याससुद्धा तसा बऱ्यापैकी वाव आहे, खचितच. काहीही असो, आगामी आशिया कप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतातील श्रीरामाची मदत घेण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने घेतला आहे, खरा!

बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाचे तांत्रिक सल्लागार म्हणून भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू श्रीधरन श्रीराम यांची निवड झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नाझमुल हसन यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. भारताच्या राजकीय मैदानात ज्यांच्या ओठी रामनाम त्यांच्या विरोधकांना ‘पळता भुई थोडी’ होण्यासारखे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. क्रिकेटमध्ये वातावरणाचा फायदा उठविण्याला फार महत्त्व असते. वातावरणाचा फायदा उठविणारा फलंदाज किंवा गोलंदाज यशस्वीच ठरत असतो, हमखास. आता रामनाम परिणामकारक ठरण्याच्या या वातावरणात बांगलादेशचे घोडे गंगेत न्हाते का, ते पाहणे महाराष्ट्रातील अभूतपूर्व परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या येणाऱ्या निकालाइतकेच औत्सुक्याचे ठरणार आहे, निश्चितच. ‘विसरू नको श्रीरामा मला...’ असे बांगलादेशने नव्या तांत्रिक सल्लागाराला म्हणण्याइतपत संस्मरणीय कामगिरी या संघाकडूनही अपेक्षित आहे. असे झाले तर आशिया चषक स्पर्धेत आणखीनच रंगत येऊ शकेल. बांगलादेश संघालाही तशी सामन्याचा अनपेक्षित निकाल लावत सर्वांना ‘दे धक्का’ फिल देण्याची खोड आहेच, म्हणा!

‘ नव्या तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती आशिया कपपासून केलेली असली, तरी ते टी-२० वर्ल्डकपपर्यंत काम पाहतील,’ असे सांगत बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष हसन यांनी आशिया चषक त्यांचे प्रमुख लक्ष्य असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आशिया कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करून बांगलादेशने धनुष्याला बाण लावून आतापासूनच निशाण्यावर डोळा ठेवला आहे, म्हणा ना! यामुळे नव्या तांत्रिक सल्लागारांना संघाशी एकरूप होण्यास पुरेसा अवधी देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे लाॅन्ग व्हिजनही दिसते. ‘किसने जादू चलाया, बरसों में जो हो न पाया, एक पल में वो सब हुई गवा रे, रामा रामा, हो रामा रामा, रामा रामा गजब हुई गवा रे...’ असेच म्हणण्यासारखे स्वप्न बांगलादेशने आशिया चषक पटकाविण्याबाबत पाहिले असावे. त्यामुळेच मग भारतातील तांत्रिक सल्लागाराची निवड हा आशियात सात वेळा (सहा वेळा वन-डे, एक वेळा टी-२०) अजिंक्य ठरलेल्या भारताच्या क्रिकेट साम्राज्याला ललकारण्याचा बांगलादेशचा खटाटोप आहे का, असाही प्रश्न स्वाभाविकपणेच संवेदनशील मनाला सहजच पडून जातो.

श्रीधरन श्रीराम यांनी २००० ते २००४ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ते आठ वन-डे सामने खेळले; परंतु एक खेळाडू म्हणून ‘आठवावा प्रताप’ असा भव्यदिव्य पराक्रम करण्यास त्यांना यश आले नाही. सातत्य राखता न आल्याने त्यांनी संघातील स्थान गमावले. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे सहाय्यक फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डॅरेल लेहमन यांच्या बरोबरीने श्रीराम यांनी २०१६मध्ये फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी वाहिली होती. टी-२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार असल्याने श्रीराम यांच्या तेथील अनुभवाचा वापर करून घेण्याची बेरकी खेळीही बांगलादेशने खेळल्याचे दिसून येते. श्रीराम यांनी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतही (आरसीबी) काम केले होते. खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही बाबतीत तत्कालीन परिस्थितीत श्रीराम यांना फारसे सामर्थ्य दाखविता आले नाही. ‘वक्त वक्त की बात होती हैं,’ असे म्हणतात. ‘कल ये रात अंधेरी थी, आज सुहानी रात हैं, वक्त वक्त की बात हैं, वक्त वक्त की बात हैं...’ असेही बांगलादेशच्या या नव्या तांत्रिक सल्लागाराच्या बाबतीत घडू शकते. त्यामुळे ‘देखते रह गये सब, मैंने मार लिया मैदान...’ असेही ते अभिमानाने म्हणू शकतील. आता रामनामाचे महात्म्य वाढले आहे. अशा स्थितीत कोणी सांगावे, क्रिकेटच्या मैदानातही या ऊर्जेचा शिरकाव होऊही शकतो.

टी-२० क्रिकेटमध्ये श्रीराम यांना आयपीएलमुळे गाढा अनुभव मिळाला आहे आणि त्यामुळेच आम्ही त्यांची टी-२० फॉरमॅटमध्ये खेळविल्या जाणाऱ्या आशिया चषकासाठी निवड करण्यास उद्युक्त झालो, असेही हसन यांनी स्पष्ट केले; मात्र प्रशिक्षक म्हणून श्रीराम यांची निवड केल्याच्या वृत्तांचा त्यांनी इन्कार केला. श्रीराम यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती झालेली असतानाच दक्षिण आफ्रिकेचे रसेल डोमिंगो हे नोव्हेंबर महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून कायम राहणार असल्याचे सूतोवाचही एका अधिकाऱ्याने केले आहे. श्रीराम यांची कामगिरी पाहूनच त्यांना पुढे कायम ठेवायचे की नाही, याचा निर्णय होणार असल्याचे हसन यांनीदेखील स्पष्ट केले आहे. म्हणजेच, कसोटी सामन्यासाठी श्रीराम हे तांत्रिक सल्लागार म्हणून राहतीलच, असे नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ‘रामबाण’ भारतावर सोडण्याचे बांगलादेश खुबीने टाळणार असल्याचेच यावरून ध्वनित होत आहे. रामाच्या भूमीत ‘रामबाण’ बूमरँगसारखा उलटण्याची भीती बांगलादेशला वाटतेय की काय? भारताला मात्र कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. आशिया चषकापुरते सांगायचे, तर भारतीय संघात अनेक दिग्गज आहेत. रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान असे एकापेक्षा एक सरस खेळाडू संघात आहेत. प्रतिस्पर्ध्यांचे डोळे दीपवून टाकणारे सूर्य, रवी यांचे तेज असलेले प्रतिभाशाली खेळाडू आहेत. अंधारात आशेचा किरण दाखविणारे दीप, दीपक आहेत. कार्तिक, भुवनेश्वर हे तर ईश्वरच. तरीही गाफील राहून चालणार नाही. मानसिक खंबीरतेसाठी असा आध्यात्मिक आधार अवश्य हवाच; पण त्याला प्रयत्नांची जोडही असायला हवी. या प्रयत्नात मात्र ‘राम’ असायलाच हवा. ‘विराट’ रूप दाखवायचे तर ‘आवेश’ हवाच. खेळाडूंना पर्याय बहुत मिळतील; पण कठोर परिश्रमास पर्याय नाही. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ हा सुविचार संयुक्त अरब अमिरातीमध्ये तर हटकून सदैव स्मरणात ठेवायलाच हवा. बाकी राम महात्म्यावर सत्तारूढ झालेल्या सरकारचा आशीर्वाद टीम इंडियाच्या पाठीशी असणारच आहे. तरीही आपण सारेच जण आशिया चषक पटकाविण्यासाठी भारतीय संघाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊ या!

logo
marathi.freepressjournal.in