इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींना जायबंदी शमी मुकण्याची शक्यता

शमीने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतासाठी सर्वाधिक २४ बळी मिळवले. मात्र त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही.
इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींना जायबंदी शमी मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे. ३३ वर्षीय शमी सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पायाच्या दुखापतीवर उपचार घेत आहे.

शमीने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतासाठी सर्वाधिक २४ बळी मिळवले. मात्र त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. विश्वचषकानंतर पायाचा घोटा दुखावल्यामुळे शमी आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकला. आता २५ जानेवारीपासून इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिल्या दोन लढती अनुक्रमे हैदराबाद व विशाखापट्टणम येथे होणार आहे. राजकोट येथे १५ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटीपर्यंत शमी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. चौथी व पाचवी कसोटी अनुक्रमे रांची व धरमशाला येथे होईल.

“मी लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होईन. एनसीएची वैद्यकीय फळी माझ्या तंदुरुस्तीसाठी फार मेहनत घेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यापर्यंत मी नक्कीच खेळण्यास सज्ज असेन,” असे शमी म्हणाला. शमीला मंगळवारी राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने विश्वचषकात ७ सामन्यांतच २४ बळी पटकावले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in