अँडरसन पर्वाचा विजयी अस्त! पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून विंडीजचा अडीच दिवसांतच धुव्वा

"मला आणखी एक बळी मिळवण्यासह संघाचा विजय पक्का करता आला असता. मात्र जे झाले ते झाले. २१ वर्षांचा सुंदर प्रवास आज समाप्त झाला"
अँडरसन पर्वाचा विजयी अस्त! पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून विंडीजचा अडीच दिवसांतच धुव्वा
Published on

लंडन : महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला थाटात विजयी निरोप देण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला. ४१ वर्षीय अँडरसनने १८८ कसोटींतील ७०४ बळींसह आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा केला. लॉर्ड्स स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने अडीच दिवसांतच वेस्ट इंडिजचा १ डाव आणि तब्बल ११४ धावांच्या फरकाने फडशा पाडला. पदार्पणातच १२ बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

या विजयासह इंग्लंडने तीन लढतींच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना १८ जुलैपासून नॉटिंघम, तर तिसरा सामना २६ जुलैपासून बर्मिंघम येथे खेळवण्यात येईल. विंडीजला पहिल्या डावात १२१ धावांत गुंडाळल्यावर इंग्लंडने ३७१ धावांपर्यंत मजल मारून २५० धावांची आघाडी घेतली. मात्र या प्रत्युत्तरात विंडीजचा दुसरा डाव शुक्रवारीच ४७ षटकांत १३६ धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडने डावाच्या फरकाने विजय नोंदवला. अँडरसनच्या कारकीर्दीतील ही अखेरची लढत असल्याने त्याला खास मानवंदना देण्यात आली. यावेळी सहकाऱ्यांसह चाहत्यांचे अभिवादन करताना अँडरसनचे डोळेही काहीसे पाणावले.

उभय संघांतील या लढतीत गुरुवारीच इंग्लंडचा संघ दोन दिवसांत विंडीजची दाणादाण उडवणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र गुडाकेश मोटी (नाबाद ३१) आणि अलिक अथांझे (२२) यांनी काहीसा प्रतिकार करून विंडीजचा पराभव शुक्रवारपर्यंत लांबवला. ६ बाद ७९ धावांवरून शुक्रवारी दुसऱ्या डावाचा खेळ पुढे सुरू करताना अँडरसननेच जोशुआ डा सिल्व्हाला (९) बाद करून विंडीजचा सातवा झटका दिला. अँडरसनच्या कारकीर्दीतील हा अखेरचा बळी ठरला. त्यानंतर २६ वर्षीय ॲटकिन्सनने शामर जोसेफ (३), अल्झारी जोसेफ (८) यांना जाळ्यात अकडवले. अखेर ॲटकिन्सनने जेडन सील्सला (८) बाद केले आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. पहिल्या डावात ॲटकिन्सनने ७, तर दुसऱ्या डावात ५ बळी मिळवून सामनावीर पुरस्कार पटकावला.

दरम्यान, लॉर्ड्स येथूनच २००३मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे सुरू झालेल्या अँडरसनचा प्रवास लॉर्ड्सवरच येऊन संपला. त्याला या मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळून ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नच्या ७०८ बळींचा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र वाढते वय आणि आगामी ॲशेस मालिकेसाठी नव्या गोलंदाजांसह संघबांधणीचा विचार करता अँडरसनने विंडीजविरुद्धची पहिली कसोटीच कारकीर्दीतील अखेरची असेल, हे जाहीर केले होते. अखेर १८८ कसोटींतील ७०४ बळींसह अँडरसनने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा केला. २००९मध्येच अँडरसनने अखेरचा टी-२०, तर २०१५मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. मात्र कौंटी स्पर्धेत लँकशायर संघाकडून खेळत राहायचे की नाही, याचा आपण अद्याप विचार केलेला नाही, असेही अँडरसनने स्पष्ट केले.

१०९ - अँडरसन त्याच्या २१ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत इंग्लंडच्या १०९ खेळाडूंसह खेळला. त्याने नासीर हुसैनच्या नेतृत्वाखाली २००३मध्ये पदार्पण केले. निवृत्तीच्या कसोटीनंतर हुसैननेच अँडरसनची मुलाखत घेतली.

८३ -अँडरसनचा समावेश असताना इंग्लंडने ८३ कसोटी सामने जिंकले. यांपैकी २०१०-११मध्ये ऑस्ट्रेलियात जिंकलेली ॲशेस मालिका, २०१२मध्ये भारताला भारतातच नमवण्याचा केलेला पराक्रम यांसारख्या संस्मरणीय विजयांचा समावेश आहे.

३ - कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अँडरसन (७०४) तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन ८०० बळींसह पहिल्या, तर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न ७०८ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गुडाकेश मोटीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल सोडल्यामुळे मी निराश आहे. मला आणखी एक बळी मिळवण्यासह संघाचा विजय पक्का करता आला असता. मात्र जे झाले ते झाले. २१ वर्षांचा सुंदर प्रवास आज समाप्त झाला. हा क्षण मला आयुष्यभर स्मरणात राहील. एखाद्या वेगवान गोलंदाजाला इतके वर्ष खेळणे किती अवघड आहे, हे शब्दांत सांगू शकत नाही. माझे कुटुंब सहकारी, प्रशिक्षक, चाहते यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. इंग्लंडसाठी खेळणे हेच माझ्या आयुष्यातील सर्वात आवडीचे काम होते. हे कार्यासाठी नेहमी सर्वस्व अर्पण केल्याचा अभिमान असेल. - जेम्स अँडरसन

कसोटी कारकीर्द

-पदार्पण : मे, २००३ वि. झिम्बाब्वे

-अखेरचा सामना : जुलै, २०२४ वि. वेस्ट इंडिज

-सामने : १८८

-बळी : ७०४

-सरासरी : २६.४५

-डावात ५ बळी : ३२

-सामन्यात १० बळी : ३

-सर्वोत्तम : ४२ धावांत ७ बळी (२०१७ वि. वेस्ट इंडिज)

संक्षिप्त धावफलक

-वेस्ट इंडिज (पहिला डाव) : १२१

-इंग्लंड (पहिला डाव) : ३७१

-वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ४७ षटकांत सर्व बाद १३६ (गुडाकेश मोटी नाबाद ३१, अलिक अथांझे २०; गस ॲटकिन्सन ५/६१, जेम्स अँडरसन ३/३२)

-सामनावीर : गस ॲटकिन्सन

logo
marathi.freepressjournal.in