

हुबळी : ९२ वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांनी ६७ वर्षांपूर्वी पदार्पण केले. मात्र देशाच्या क्रिकेटच्या इतिहासात कच्चा लिंबू अशी ओळख असलेल्या जम्मू-काश्मीरने दमदार कामगिरी करत बलाढ्य कर्नाटकला हरवून रणजी करंडकावर नाव कोरण्याची करामत करून दाखवली.
जम्मू-काश्मीरने याआधी २०१३-१४, २०१९-२० आणि २०२४-२५ या मोसमात रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पण यंदा पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जम्मू-काश्मीरने तब्बल दोन दिवसांपेक्षा जास्त काळ फलंदाजी करत कर्नाटकच्या प्रतिकारातील हवा काढून टाकली होती. जम्मू-काश्मीरने पहिल्याच डावात ५८४ धावा करत जेतेपदाच्या दिशेने कूच केली होती. लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, करुण नायर, श्रेयस गोपाल यांसारखे तगडे फलंदाज असतानाही जम्मू-काश्मीरने कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावांवर आटोपत २९१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेत जेतेपद निश्चित केले होते. मयांक अगरवाल याने १६० धावांची चिवट झुंज दिली असली तरी त्यांना जम्मू-काश्मीरच्या धावसंख्येच्या जवळपासही पोहोचता आले नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात ४ बाद ३४२ धावा करत त्यांनी जेतेपद आपल्या नावावर केले.
सलामीवीर कामरान इक्बाल याने दुसऱ्या डावात नाबाद १६० धावांची खेळी केली तर त्याला उत्तम साथ देताना साहिल लोटराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक साजरे केले.
आम्ही करून दाखवले - ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे शुक्रवारी हुबळीत दाखल झाले होते. पाचव्या दिवशी पहिल्यावहिल्या रणजी करंडक जिंकणाऱ्या जम्मू-काश्मीर संघाच्या अविस्मरणीय क्षणांचे ते साक्षीदार होते. आम्ही करून दाखवले, वेलडन जम्मू-काश्मीर, अशाच भावना त्यांच्या मुखातून यावेळी उमटल्या.
जम्मू-काश्मीरचे जेतेपद प्रेरणादायी - तेंडुलकर
काश्मीरच्या झाडांच्या फांद्यांपासून बनलेल्या बॅट या अनेक चॅम्पियन्सच्या किटमधील प्रमुख घटक आहेत. त्यामुळे देशातील चॅम्पियन्स घडवणाऱ्या जम्मू-काश्मीरचा स्वतः चॅम्पियन्स बनण्यापर्यंतचा प्रवास अवर्णनीय आहे. त्यांचे जेतेपद हे निश्चितच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मोसमात त्यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखले. प्रतिस्पर्ध्याचा प्रतिकार मोडून काढत त्यांनी जेतेपदावर नाव कोरले, अशा शब्दांत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने रणजी विजेत्या जम्मू-काश्मीर संघाची स्तुती केली.