
दुबई : भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) दोन पुरस्कारांसाठी नामांकन लाभले आहे. २०२४ या वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूसह कसोटीतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठीही बुमराला नामांकन देण्यात आले आहे.
दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयसीसीकडून वार्षिक पुरस्कारांचे नामांकन तसेच वितरण करण्यात येते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील आंतरराष्ट्रीय सामन्यांचा आढावा नामांकनासाठी विचारात घेतला जाणार आहे. तसेच विजेत्यांची निवड करताना परीक्षकांच्या मतांसह चाहत्यांचा मताचाही आढावा घेण्यात येतो. परीक्षकांमध्ये आयसीसीचे पदाधिकारी, माजी क्रिकेटपटू, समालोचक, आयसीसी हॉल ऑफ फेमचे सदस्य यांचा समावेश असतो. २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता. कसोटीत उस्मान ख्वाजा, एकदिवसीयमध्ये भारताचा विराट कोहली, तर टी-२०मध्ये भारताच्याच सूर्यकुमार यादवने बाजी मारली होती. यंदा मात्र विराट व सूर्यकुमार यांना कोणत्याही प्रकारात नामांकन लाभलेले नाही.
दरम्यान, ३१ वर्षीय बुमरा सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत खेळत असून त्याने या मालिकेतील आतापर्यंतच्या ४ सामन्यांत सर्वाधिक ३० बळी पटकावले आहेत. २०२४ या वर्षात बुमरानेच कसोटीत १३ लढतींमध्ये सर्वाधिक ७१ बळी मिळवले. त्याशिवाय टी-२०चा विचार करता बुमरा जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याने भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावताना ८ सामन्यांत १५ बळी पटकावले. वर्षभरात बुमरा एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. मात्र टी-२० व कसोटीतील त्याची कामगिरी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरवू शकते.
बुमराला मात्र इंग्लंडचा जो रूट, हॅरी ब्रूक आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड यांच्याकडून वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या शर्यतीत कडवी झुंज मिळेल. रूटने वर्षभरात १७ कसोटींमध्ये ६ शतके झळकावताना तब्बल १,५५६ धावा कुटल्या. रूटने वर्षभरात एकही एकदिवसीय अथवा टी-२० सामना खेळला नाही. मात्र कसोटीत त्याने सातत्याने योगदान दिले. सध्या कसोटी क्रमवारीत रूट अग्रस्थानी आहे. त्याशिवाय ब्रूकने १२ कसोटींमध्ये १,१०० धावा केल्या. यामध्ये त्रिशतकाचाही समावेश आहे. रूट व ब्रूक यांना बुमराप्रमाणेच कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूसाठीही नामांकन लाभले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या हेडने वर्षभरात ९ कसोटींमध्ये ६०८ धावा, तर १५ टी-२० सामन्यांत ५३९ धावा केल्या. सध्या भारताविरुद्धच्या मालिकेत हेडनेच सर्वाधिक ४१० धावा केल्या आहेत. वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या शर्यतीत मात्र हेडच्या जागी श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसने जागा मिळवली. कामिंदूने वर्षभरात ९ कसोटींमध्ये तब्बल ७४च्या सरासरीने १,०४९ धावा केल्या. त्याने सर्वात जलद १,००० धावा टप्पा गाठणाऱ्यांच्या शर्यतीत सर डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी करण्याचा पराक्रमही केला. त्यामुळे कसोटी पुरस्कारासाठी बुमरा, रूट व ब्रूक यांना मेंडिसकडून आव्हान मिळेल.
भारताकडून गेल्या दशकभरात रविचंद्रन अश्विन व विराट कोहली यांनीच सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे आता बुमराही त्यांच्या पंक्तीत सहभागी होणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
टी-२० प्रकारात अर्शदीपला नामांकन
वर्षातील सर्वोत्तम टी-२० पुरुष क्रिकेटपटूसाठी भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला नामांकन लाभले आहे. अर्शदीपने टी-२० विश्वचषकात सर्वाधिक १७ बळी घेतले. वर्षभरात त्याने एकूण ३६ बळी टिपले. त्याला बाबर आझम, हेड, सिकंदर रझा यांच्याकडून कडवी झुंज मिळेल. त्याशिवाय महिलांमध्ये एकदिवसीय प्रकारात भारताच्या स्मृती मानधनाला नामांकन मिळाले आहे. स्मृतीने वर्षभरात ७४३ धावा केल्या. वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूंमध्ये भारताच्या श्रेयांका पाटीलला नामांकन लाभले आहे.
बुमरा @२०२४
१३ कसोटी सामन्यांत ७१ बळी; २० पेक्षाही कमी सरासरी.
८ टी-२० मध्ये ४.१७ सरासरीने १५ बळी.
टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू.
पर्थ येथे यशस्वी नेतृत्व.
या खेळाडूंना नामांकन
वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू : जसप्रीत बुमरा (भारत), ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), जो रूट (इंग्लंड), हॅरी ब्रूक (इंग्लंड)
वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू : जसप्रीत बुमरा (भारत), जो रूट (इंग्लंड), हॅरी ब्रूक (इंग्लंड), कामिंदू मेंडिस (श्रीलंका)
वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू : वानिंदू हसरंगा (श्रीलंका), कुशल मेंडिस (श्रीलंका), अझमतुल्ला ओमरझाई (अफगाणिस्तान), शर्फेन रुदरफोर्ड (वेस्ट इंडिज)
वर्षातील सर्वोत्तम टी-२० खेळाडू : अर्शदीप सिंग (भारत), बाबर आझम (पाकिस्तान), ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), सिकंदर रझा (झिम्बाब्वे)