पाठदुखी बुमराची; डोकेदुखी भारताची! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता

भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे.
पाठदुखी बुमराची; डोकेदुखी भारताची! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता
Published on

नवी दिल्ली : भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे. बुमराची पाठदुखी गंभीर स्वरुपाची असल्याने भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. पीटीआय तसेच अन्य क्रीडा संकेतस्थळांनी रविवारी दिलेल्या वृत्तांनुसार बुमरा थेट मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल असे समजते.

३१ वर्षीय बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकताच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अवघ्या १३.०६च्या सरासरीने तब्बल ३२ बळी मिळवले. बुमराने या मालिकेत १५०हून अधिक षटके गोलंदाजी केली. भारताने ही मालिका १-३ अशी गमावली. मात्र बुमराच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सिडनी येथील पाचव्या कसोटीत बुमरा भारताचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र पाठदुखीमुळे दुसऱ्या डावात बुमरा गोलंदाजीसाठी आला नाही. पहिल्या डावातच गोलंदाजीच्या वेळेस त्याची पाठ दुखू लागल्याने स्टेडियम सोडून तो स्कॅन करण्यासही गेला होता. सध्याच्या माहितीनुसार बुमराची पाठदुखी ग्रेड-२ किंवा ग्रेड-३ स्वरुपातील असल्याचे समजते. त्यामुळेच बुमराला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे.

१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ अनुक्रमे २० व २३ फेब्रुवारी रोजी बांगलादेश व पाकिस्तानविरुद्ध साखळी लढत खेळणार आहे. त्यानंतर २ मार्चला भारताची न्यूझीलंडशी गाठ पडेल. त्यामुळे थेट मार्च महिन्यातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी बुमरा उपलब्ध असू शकतो. बुमराच्या पाठीला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र पाठीचे स्नायू ताणले गेल्यामुळे तसेच सातत्याने सूज येत असल्याने तो गोलंदाजी करू शकत नाही.

दरम्यान, २२ जानेवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यात ५ टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून ३ लढतींची एकदिवसीय मालिका सुरू होईल. मोहम्मद शमीचे वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले असले तरी बुमरा मात्र इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

बुमराची सद्य:स्थिती काय?

बुमराची पाठदुखी ग्रेड-२ ते ग्रेड-३ स्वरुपातील आहे. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी किमान आणखी एक ते दीड महिना जाऊ शकतो.

बुमराच्या पाठीला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र पाठीचे स्नायू ताणले गेल्यामुळे तसेच सातत्याने सूज येत असल्याने तो गोलंदाजी करू शकत नाही.

एनसीएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमरा तंदुरुस्त झाल्यावर किमान १-२ सामन्याद्वारे त्याची चाचणी घेऊनच त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची मुभा देण्यात येईल. या सर्व घडामोडींसाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

बीसीसीआयची आयसीसीकडे अतिरिक्त वेळेची मागणी

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संघ जाहीर करण्यासाठी रविवार अखेरचा दिवस होता. मात्र बीसीसीआयने आयसीसीकडे काही दिवसांची अतिरिक्त मुदत मागितल्याचे समजते. १५ जणांचा संघ जाहीर करून १२ फेब्रुवारीपर्यंत त्यामध्ये बदल करण्याची मुभा सर्व संघांना आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश या संघांचे संघ जाहीर झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघ बुमराच्या तंदुरुस्तीचा आढावा घेऊन लवकरच संघ जाहीर करेल, असे अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in