

मुंबई : तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासह चौघांचे भारताच्या टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. मात्र तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण झाल्यावरच या खेळाडूंचा अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला जाईल. बुमराव्यतिरिक्त अष्टपैलू नितीश रेड्डी, फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर, मध्यमगती गोलंदाज हर्षित राणा या खेळाडूंना तंदुरुस्तीची अट घालून तूर्तास संघात स्थान देण्यात आले आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ अनुक्रमे १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर ही मालिका होईल. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ या मालिकेचे यजमानपद भूषवत असून बीसीसीआयशी केलेल्या करारानुसार या लढती भारतातच खेळवण्यात येत आहेत. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ज्या खेळाडूंची निवड झाली आहे, त्यांनाच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत टी-२० प्रकारांत होतील.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान ३२ वर्षीय बुमराच्या गुढघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले होते. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला होता. तसेच, भारताच्या आगामी २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषकाचे नियोजन लक्षात घेता निवडकर्त्यांनी बुमरा आणि हार्दिक पंड्या यांच्या कार्यभाराचे व्यवस्थापन करण्याचे निश्चित केले आहे. बुमरासह हर्षित, नितीश, सुंदर हे खेळाडू सध्या बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या अकादमीत ‘रिटर्न टू प्ले’ नियमावलीनुसार वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान २४ वर्षीय हर्षित राणाच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. राणाला या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेतूनही बाहेर राहावे लागले होते. सुंदरही इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. २३ वर्षीय नितीशला अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईत झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्रास जाणवल्याने तो श्रीलंका दौऱ्यासाठी जाऊ शकला नाही.
एकूणच आता या चौघांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पहिल्या लढतीपर्यंत यांच्यापैकी एकासही तंदुरुस्ती सिद्ध करता आली नाही, तर त्यांचे स्थान धोक्यात येऊ शकते.
भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा. n नितीश, बुमरा, सुंदर, हर्षित यांचा समावेश तंदुरुस्ती चाचणीनंतर.
भारत-अ संघाचा न्यूझीलंड दौरा
भारतीय संघ २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. १९ नोव्हेंबरपासून भारत-न्यूझीलंड यांच्यात २ कसोटी सामनेदेखील होतील. याच मालिकेसाठी भारतीय खेळाडूंना उत्तम सराव व्हावा, म्हणून काही खेळाडू भारत-अ संघाद्वारे न्यूझीलंड दौऱ्यावर जातील. भारत-अ आणि न्यूझीलंड-अ यांच्यात २४ ऑक्टोबरपासून ख्राईस्टचर्च येथे ४-४ दिवसांचे प्रत्येकी ३ सामने खेळवण्यात येतील.
भारताचा पुढील तीन महिन्यांचा कार्यक्रम
वि. अफगाणिस्तान : ३ टी-२० सामने (१३ ते १७ सप्टेंबर)
आशियाई क्रीडा स्पर्धा : उपांत्यपूर्व फेरी (२८ सप्टेंबरपासून)
वि. वेस्ट इंडिज : ३ एकदिवसीय, ५ टी-२० (२७ सप्टेंबर-१६ ऑक्टोबर)
भारताचा न्यूझीलंड दौरा : २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर
सॅमसन, वरुणही संघात परतले
श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत ३ टी-२० मालिका खेळला आहे. त्यांपैकी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यात भारताच्या पदरी सपशेल निराशा पडली, तर झिम्बाब्वेविरुद्ध भारताने ३-० असे निर्भेळ यश मिळवले होते. २०२६च्या टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या संजू सॅमसनला झिम्बाब्वे मालिकेसाठी वगळण्यात आले होते, तर वरुण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जायबंदी झाल्याने झिम्बाब्वेविरुद्ध उपलब्ध नव्हता. आता हे दोघेही संघात परतले आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग, सूर्यांश शेडगे, प्रिन्स यादव, मयांक यादव व यश ठाकूर यांना यावेळी वगळण्यात आले आहे.