...म्हणूनच कसोटी कर्णधारपद नाकारले ! भारतीय संघाच्या नेतृत्वाविषयी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने केला खुलासा

बुमरा २० जूनपासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा भाग असेल, हे पक्के आहे. बुमराने स्वतः ही हे सुनिश्चित केले. त्यानंतर मात्र...
...म्हणूनच कसोटी कर्णधारपद नाकारले ! भारतीय संघाच्या नेतृत्वाविषयी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने केला खुलासा
Published on

लीड्स : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात यावे, अशी मागणी असंख्य चाहत्यांसह क्रिकेटतज्ज्ञांनी केली होती. मात्र बुमराने स्वतःहूनच कसोटी संघाचे कर्णधारपद नाकारल्याचे समोर आले आहे. बुमराने इंग्लंडमधील स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत नेतृत्वाशी निगडित विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी युवा फलंदाज शुभमन गिलकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित व पाठोपाठ विराट कोहलीने मे महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यावेळी बुमराच भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार होईल, असे सर्वांना वाटले. कारण रोहितच्या अनुपस्थितीत जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतही बुमराने भारताचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र बुमराची तंदुरुस्ती व अन्य बाबींचा विचार करता निवड समिती व बीसीसीआयने गिलला कर्णधारपदासाठी पसंती दिली. त्यावेळी चाहत्यांसह काही माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयवर टीकासुद्धा केली. अखेरीस ३१ वर्षीय बुमरानेच याविषयीच्या सर्व चर्चाना पूर्णविराम लगावला आहे.

"मला कसोटी संघाचे कर्णधारपद नाकारण्यात आले, अशा अफवा पसरल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नाही. मी स्वतःहूनच आयपीएल सुरू असताना बीसीसीआयशी याबाबत संवाद साधला होता. त्यावेळी रोहित अथवा विराट निवृत्तसुद्धा झाले नव्हते. मात्र मी बीसीसीआयला कर्णधारपदासाठी माझा विचार करू नये, असे सुचवले होते," असे बुमरा म्हणाला. जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या कसोटीतून बाहेर गेल्यावर बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकला. तसेच आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्ससाठी सुरुवातीच्या ४ सामन्यांना अनुपलब्ध होता. त्यानंतर बुमराने झोकात पुनरागमन केले. मात्र कसोटी क्रिकेटचा विचार करता शरीरावर अतिरिक्त भार येणार नाही किंवा पुन्हा पाठदुखी बळावणार नाही, याचा बुमराला सातत्याने विचार करावा लागणार आहे.

"ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पाठदुखीमुळे मैदान सोडल्यावर ही दुखापत कितपत गंभीर आहे, हे मला समजले. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूसह मी काही विशेषज्ञांशीही याविषयी संवाद साधला. त्यांनी मला खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्क लोड मॅनेजमेंट) व तंदुरुस्तीचा विचार करता ५ सामन्यांची कसोटी मालिका असेल, तर मी ३ सामनेच खेळावे, असे सुचवले. मीसुद्धा त्यांच्या मताचा गांभीर्याने विचार केला व बीसीसीआयला याविषयी कळवले. कारण मी ३ सामन्यांत नेतृत्व करून उर्वरित २ सामन्यांसाठी अन्य खेळाडूला कर्णधार बनवणे चुकीचे ठरले असते," असेही बुमराने सांगितले.

"कर्णधारपदापेक्षा संघाचा विचार करण्यास माझे प्राधान्य आहे. गिलच्या नेतृत्वात आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू. मी खेळाडू तसेच एक लीडर म्हणून संघासाठी प्रत्येक वेळी उपलब्ध असेल. मात्र यासाठी मी कर्णधारच असावे, याची सक्ती नसावी. मला भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी लाभली, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. मात्र यापुढे ४ किंवा ५ सामन्यांची कसोटी मालिका असेल, तर मी सर्व सामने खेळणे कठीण आहे," असेही बुमराने नमूद केले.

पहिल्या कसोटीत समावेश पक्का; उर्वरित निर्णय नंतर

बुमरा २० जूनपासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा भाग असेल, हे पक्के आहे. बुमराने स्वतः ही हे सुनिश्चित केले. त्यानंतर मात्र उर्वरित चारपैकी बुमरा कोणत्या दोन सामन्यांत खेळणार, हे पाहणे रंजक ठरेल. उभय संघांत २ जुलैपासून बर्मिंघम येथे दुसरी, १० जुलैपासून लॉईस येथे तिसरी, २३ जुलैपासून मँचेस्टर येथे चौथी, तर ३१ जुलैपासून ओव्हल येथे पाचवी कसोटी खेळवण्यात येईल. बुमराव्यतिरिक्त भारताकडे मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, शार्दूल ठाकूर, आकाश दीप असे वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.

logo
marathi.freepressjournal.in