जस्सी जैसा कोई नहीं! ICC च्या वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या पुरस्काराला बुमराची गवसणी

जस्सी जैसा कोई नहीं... भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हाच सध्या विश्वातील सर्वोत्तम कसोटीपटू आहे, यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी शिक्कामोर्तब केले.
जस्सी जैसा कोई नहीं! ICC च्या वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या पुरस्काराला बुमराची गवसणी
Published on

दुबई : जस्सी जैसा कोई नहीं... भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हाच सध्या विश्वातील सर्वोत्तम कसोटीपटू आहे, यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी शिक्कामोर्तब केले. आयसीसीच्या २०२४ या वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू म्हणून बुमराची निवड करण्यात आली आहे. हा बहुमान मिळवणारा बुमरा भारताचा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडचा जो रूट, हॅरी ब्रूक आणि श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस यांच्यावर सरशी साधून बुमराने हा पुरस्कार पटकावला. त्याशिवाय ६ वर्षांनी भारतीय खेळाडूने आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार काबिज केला. यापूर्वी २०१८मध्ये विराट कोहलीने हा मान मिळवला होता.

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आयसीसीकडून वार्षिक पुरस्कारांचे नामांकन जाहीर करण्यात येते. त्यानंतर जानेवारीत पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कामगिरीचा आढावा पुरस्कारासाठी घेतला जातो. विजेत्यांची निवड करताना परीक्षकांच्या मतांसह चाहत्यांच्या मतांनाही महत्त्व दिले जाते. परीक्षकांमध्ये आयसीसीचे पदाधिकारी, माजी क्रिकेटपटू, समालोचक, आयसीसी हॉल ऑफ फेमचे सदस्य यांचा समावेश असतो. २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार पटकावला होता.

३१ वर्षीय बुमराने २०२४ या वर्षात अवघ्या १३ कसोटींमध्ये सर्वाधिक ७१ बळी मिळवले. मुख्य म्हणजे बुमराची सरासरी ही फक्त २.९६ इतकी होती. तसेच तिन्ही प्रकारांत मिळून बुमराने वर्षभरात फक्त १४.९२च्या सरासरीने धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील डिसेंबरपर्यंत झालेल्या ४ कसोटींमध्ये बुमराने ३० बळी पटकावले होते. तोच मालिकावीर ठरला होता. बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीतील २०० बळींचा टप्पाही गाठला. तसेच पर्थ येथील कसोटीत बुमराने भारताचे नेतृत्व करताना दुहेरी छाप पाडली होती. त्यामुळे कसोटीत बुमराला हा पुरस्कार देण्यावाचून आयसीसीकडे पर्याय नव्हताच, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

“आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवल्याने मी आनंदी आहे. कसोटी क्रिकेट हे नेहमीच माझ्यासाठी सर्वोच्च स्थानावर असेल. २०२४ हे वर्ष संस्मरणीय ठरले. विशाखापट्टणम येथे ओली पोपला त्रिफळाचीत करण्यासाठी टाकलेला यॉर्कर चेंडू माझ्यासाठी खास आहे, कारण तेथून आम्ही सामन्यावर वर्चस्व मिळवले,” असे बुमरा म्हणाला.

बुमराला रूटकडून कडवी झुंज मिळाली. त्याला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली. रूटने २०२४मध्ये १७ कसोटींत ६ शतके झळकावताना तब्बल १,५५६ धावा केल्या. तसेच ब्रूकने १२ कसोटींमध्ये १,१०० धावा केल्या. श्रीलंकेच्या कामिंदूने ९ कसोटींमध्ये १,०४९ धावा केल्या होत्या. मात्र बुमराने या तिघांना पिछाडीवर टाकून कारकीर्दीत प्रथमच आयसीसीचा पुरस्कार मिळवला.

बुमराला आज आणखी एका पुरस्काराची संधी

आयसीसीच्या २०२४ या वर्षातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूची (तिन्ही प्रकारांतील) घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे. यामध्ये पुरुष विभागात बुमराला आणखी एक पुरस्कार पटकावण्याची संधी आहे. बुमरासह ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड, इंग्लंडचा रूट आणि ब्रूक हेसुद्धा या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. विजेत्या खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी देऊन गौरवण्यात येते. भारताकडून आतापर्यंत राहुल द्रविड (२००४), सचिन तेंडुलकर (२०१०), रविचंद्रन अश्विन (२०१६), विराट कोहली (२०१७, २०१८) यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सर्वोत्तम कसोटीपटूचा मान मिळवला होता. बुमरा २०२४मध्ये टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तसेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध त्याने कसोटी मालिकांमध्ये छाप पाडली. त्यामुळे बुमरा दुहेरी पुरस्कारांना गवसणी घालू शकतो.

बुमरा हा वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू ठरणारा भारताचा एकंदर सहावा खेळाडू ठरला. यापूर्वी राहुल द्रविड (२००४), गौतम गंभीर (२००९), विरेंद्र सेहवाग (२०१०), रविचंद्रन अश्विन (२०१६), विराट कोहली (२०१८) यांनी हा पराक्रम केला आहे. यातील अश्विन हा फिरकीपटू होता, तर अन्य सर्व फलंदाज होते. वेगवान गोलंदाज म्हणून अशी कामगिरी करणारा बुमरा पहिलाच.

logo
marathi.freepressjournal.in