
बर्मिंघम : भारत-इंग्लंड यांच्यात २ जुलैपासून बर्मिंघम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी तसेच एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंबंधी माहिती दिली आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना भारताला पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला. भारताने दिलेले ३७१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारतीय गोलंदाज दुसऱ्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरले, तर क्षेत्ररक्षणातही त्यांनी चुका केल्या. त्यामुळे भारताने गेल्या ९ कसोटींपैकी तब्बल सात कसोटींमध्ये पराभव पत्करला आहे. आता त्यातच बुमरा दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसला, तर भारतीय संघापुढील समीकरण आणखी बिकट होणार आहे.
बुमराला पाठदुखीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीतील पाचव्या कसोटीत मध्यातूनच माघार घ्यावी लागली होती. तेव्हापासूनच त्याला वर्कलोड मॅनेजमेंट (खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन) व पाठीच्या स्नायूंची काळजी घेण्याच्या हेतूने सामन्यांची योग्य निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळू शकला नाही. आयपीएलमध्ये ४ सामन्यांनंतर त्याने पुनरागमन केले.
इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच बुमरा फक्त तीनच सामन्यांत खेळू शकेल, हे स्पष्ट झाले होते. आता पहिल्या कसोटीत बुमराने दोन्ही डावांत मिळून ४४ षटके गोलंदाजी केली. तसेच ५ बळी मिळवले. १० जुलैपासून लॉर्ड्सवर तिसरी कसोटी रंगणार असल्याने बुमरा त्यावेळी उपलब्ध असेल, असे समजते. दुसऱ्या कसोटीत बुमराच्या जागी डावखुरा अर्शदीप सिंग किंवा आकाश दीपला संधी दिली जाऊ शकते. हर्षित राणाला भारतीय संघातून मुक्त केले आहे. त्यामुळे तो आता कसोटी संघाचा भाग नाही. बुमरा नसल्यास मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णावर जबाबदारी असेल.
इंग्लंडच्या संघात आर्चरचे पुनरागमन
३० वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे. आर्चर फेब्रुवारी २०२१मध्ये अहमदाबाद येथे भारताविरुद्धच अखेरची कसोटी खेळला होता. त्यानंतर सततची दुखापती व विविध कारणास्तव तो कसोटी संघापासून दूर राहिला. आता आर्चर पुन्हा एकदा कसोटी संघात स्थान पटकावण्यास सज्ज आहे. इंग्लंडने पहिल्या लढतीसाठी ख्रिस वोक्स, जोश टंग व ब्रेडन कार्स या वेगवान त्रिकुटाला संघात स्थान दिले होते. टंग किंवा कार्सऐवजी आर्चरचे पुनरागमन पक्के मानले जात आहे.