

मुंबई : भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हाच गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यातील जय-पराजयातील अंतर ठरला. बुमराने टाकलेल्या १६व्या व १८व्या अफलातून षटकामुळे भारताने इंग्लंडवर सरशी साधली, अशा शब्दांत संघसहकारी व माजी क्रिकेटपटूंनी बुमरावर स्तुतिसुमने उधळली.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडला भारताने २० षटकांत ७ बाद २४६ धावांत रोखले. मुख्य म्हणजे जेकब बेथलच्या शतकामुळे एकवेळ इंग्लंडचा संघ लक्ष्य सहज गाठणार, असे वाटत होते.
मात्र इंग्लंडला ३० चेंडूंत ६९ धावांची गरज असताना बुमराने १६व्या षटकात फक्त ८ धावा दिल्या. तर १८ चेंडूंत ४५ धावांची आवश्यकता असताना बुमराने एकही चौकार वसूल न करता फक्त ६ धावा दिल्या. त्यामुळेच इंग्लंडच्या फलंदाजांवर उर्वरित षटकांत दडपण वाढले व अन्य गोलंदाजांवर आक्रमण करण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. परिणामी बेथल धावचीत झाला व इंग्लंडने लढतही गमावली. सामनावीर ठरलेल्या संजू सॅमसननेसुद्धा बुमराचे महत्त्व अधोरेखित केले.
“माझ्याऐवजी बुमरा सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी आहे. त्याने डेथ ओव्हर्समध्ये (अखेरच्या षटकांत) केलेली गोलंदाजी कौतुकास्पद होती. त्यामुळेच मी येथे उभा आहे. बुमरासारखा गोलंदाज भारताला लाभला, हे आपले भाग्यच. विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये तो नक्कीच अग्रेसर आहे,” असे सॅमसन म्हणाला.
या विश्वचषकात बुमराने ७ सामन्यांत १० बळी मिळवले आहेत. बळींची संख्या कमी असली तरी बुमराने या विश्वचषकात अनेकदा दडपणात गोलंदाजीस येत टिच्चून मारा केला. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाज जोखीम घेणे पत्करत नाही. त्यामुळेच धावा आपोआप कमी होतात व याचा लाभ अन्य गोलंदाजांना होतो. वानखेडेच्या ज्या खेळपट्टीवर जेथे प्रत्येक गोलंदाज षटकात किमान १० ते १२ धावा लुटत होता. तेथे बुमराने सादर केलेला गोलंदाजीचा नमुना कौतुकास्पद होता. त्यामुळेच चाहत्यांनीही बुमराची चार षटके झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट करून त्याला मानवंदना दिली.
“बुमरा हा शतकातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, यात शंका नाही. तो कोणत्याही प्रकारात भारताचा सर्वात मोठा मॅचविनर आहे. तुम्ही कोणत्याही स्थितीत, मैदानात, खेळपट्टीवर त्याच्याकडे चेंडू सोपवलात, तरी तो तुम्हाला कामगिरी करून दाखवेल. असे गोलंदाज फार क्वचित घडतात,” असे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले.
दरम्यान, २००७ व २०२४च्या विश्वविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करून एकंदर तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता रविवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात भारतासमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान असेल. ८ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे ही लढत होईल. भारताने न्यूझीलंडला आजवर टी-२० विश्वचषकात एकदाही नमवलेले नसल्याने अंतिम लढतीत पुन्हा एकदा भारताला इतिहास खुणावत आहे. त्यावेळी बुमरावर पुन्हा एकदा देशवासीयांची भिस्त असेल.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी सॅमसनसह एकूण आठ जण शर्यतीत
भारताचा सलामीवीर संजू सॅमसनला टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. आयसीसीने शुक्रवारी आठ खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये सॅमसनसह इंग्लंडचा विल जॅक्स, पाकिस्तानचा साहिबझादा फरहान, दक्षिण आफ्रिकेचे लुंगी एन्गिडी, एडीन मार्करम, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र, टिम सेईफर्ट व अमेरिकेचा शॅडली व्हॅन यांचाही समावेश आहे. सॅमसनने वेस्ट इंडिज व इंग्लंडविरुद्ध निर्णायक अर्धशतक झळकावून भारताला विजय मिळवून दिले. त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. मात्र त्याला जॅक्सकडून कडवी झुंज मिळू शकते. जॅक्सने या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करताना चार वेळा सामनावीर पुरस्कारही पटकावला. बुमराला मात्र यावेळी नामांकन लाभलेले नाही. २०२४मध्ये बुमरा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.
वेस्ट इंडिज, झिम्बाब्वेचे संघ रवाना
इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणांहून विमान उड्डाणांवर बंदी आली आहे. त्याचा फटका वेस्ट इंडिज संघालाही बसला आहे. रविवारी भारताविरुद्ध कोलकाता येथील सामन्यात पराभूत झाल्याने विंडीजचे टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. मात्र सोमवारी नवी दिल्ली येथून त्यांना दुबई येथे जाण्यास नकार देण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव विंडीजचा संघ सध्या दिल्लीतच स्थायिक आहे. त्यामुळे ते मायदेशी कधी परततील, याविषयी साशंका आहे. तसेच झिम्बाब्वेचा संघही काहीसा उशिराने त्यांच्या देशात परतल्याचे समजते. शुक्रवारी मात्र हे दोन्ही संघ आपापल्या मायदेशी टप्प्याटप्प्याने रवाना झाल्याचे समजते.