बुमरा थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार? पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेला मुकण्याची शक्यता

भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आता थेट चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.
बुमरा थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार? पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेला मुकण्याची शक्यता
Published on

सिडनी : भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आता थेट चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. पाठीच्या दुखापतीमुळे बुमरा इंग्लंडविरुद्धच्या आगामी दोन्ही मालिकांना मुकण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यानेच नाव न सांगण्याच्या अटीवर याविषयी माहिती दिली आहे.

३१ वर्षीय बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकताच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अवघ्या १३.०६च्या सरासरीने तब्बल ३२ बळी मिळवले. बुमराने या मालिकेत १५०हून अधिक षटके गोलंदाजी केली. भारताने ही मालिका १-३ अशी गमावली. मात्र बुमराच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सिडनी येथील पाचव्या कसोटीत बुमरा भारताचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र पाठदुखीमुळे दुसऱ्या डावात बुमरा गोलंदाजीसाठी आला नाही. पहिल्या डावातच गोलंदाजीच्या वेळेस त्याची पाठ दुखू लागल्याने स्टेडियम सोडून तो स्कॅन करण्यासही गेला होता. तूर्तास बुमराची पाठदुखी कितपत गंभीर आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र किमान ३ ते ४ आठवडे तो मैदानात परतणार नाही, असे समजते.

२२ जानेवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यात ५ टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून ३ लढतींची एकदिवसीय मालिका सुरू होईल. मग १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे संयुक्तपणे चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिली लढत खेळणार आहे. त्यामुळे बुमराला थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळवण्यात येऊ शकते.

“बुमराची पाठदुखी ग्रेड-१ स्वरुपाची असली, तर त्याला किमान १४ ते २१ दिवस पुन्हा मैदानावर परतण्यासाठी लागू शकतात. जर दुखापतीचे स्वरूप ग्रेड-२ अथवा ग्रेड-३ इतके असले तर एक महिन्याहून अधिक काळही यातून सावरण्यासाठी लागू शकतो. मात्र तूर्तास बुमराची देहबोली पाहता त्याला ३ आठवडे विश्रांतीसाठी पुरेसे ठरतील,” असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

बुमरा टी-२० मालिकेत तसेही खेळण्याची शक्यता कमीच होती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ खेळावा, या हेतूने इंग्लंडविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांसाठी बुमराचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र सध्याचे चित्र पाहता बुमरा इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतही खेळणार नाही, असे दिसते. आता १२ जानेवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची मुदत आहे. त्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापन बुमराविषयी कोणता निर्णय घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीव्यतिरिक्त यंदाच्या वर्षात एकही आयसीसी स्पर्धा नाही. त्यामुळे त्या स्पर्धेपूर्वी बुमरा आणि मोहम्मद शमी हे दोन्ही वेगवान गोलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त होऊ संघात परततील, अशी चाहत्यांना आशा आहे. त्या स्पर्धेत भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.

बुमरा नसल्याने आम्ही निश्चिंत : ख्वाजा

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात बुमरा गोलंदाजी करू शकणार नाही हे जेव्हा समजले त्यावेळी फलंदाज म्हणून मी तसेच माझ्यासह अन्य काहींनी सुटकेचा नि:श्वास सोडला, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने दिली. पाठदुखीमुळे बुमरा दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी मैदानात आला नाही. परिणामी तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने २७ षटकांत १६२ धावांचे लक्ष्य सहज गाठले. मुख्य म्हणजे सर्व फलंदाजांनी आक्रमण केले. बुमरा असता, तर त्याने कांगारूंना नक्कीच घाम गाळायला लावला असता.

“बुमराने या मालिकेत मला सहा वेळा बाद केले. मला हे मान्य करण्यास मूळीच कमीपणा वाटत नाही की जेव्हा, दुसऱ्या डावात बुमरा गोलंदाजी करणार नाही, हे समजले, त्यावेळी मीच सर्वाधिक आनंदी होतो. ट्रेव्हिस हेडच्याही माझ्याप्रमाणेच भावना होत्या. त्यामुळेच मी व अन्य फलंदाजांनी मुक्तपणे खेळ करताना षटकामागे ६च्या सरासरीने धावा केल्या. भारताचे अन्य गोलंदाजही दर्जेदार आहेत. मात्र बुमराची जणू माझ्या मनात एकप्रकारे भीती निर्माण झाली होती. पुढील वेळेस त्याच्याविरुद्ध आणखी उत्तम तयारी करेन,” असे ख्वाजाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in