जय शहा आयसीसीचे नवे बॉस! आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष; १ डिसेंबरपासून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार

जय शहा बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.
जय शहा आयसीसीचे नवे बॉस! आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष; १ डिसेंबरपासून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार
Credits: Twitter
Published on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा यांची वर्णी लागणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. जय शहा बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.

मंगळवारी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अन्य कुणीही रस न दाखवल्यामुळे जय शहा यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे, जय शहा यांना १६ पैकी १५ सदस्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे निवडणूक झाली असती तरी जय यांची अध्यक्षपदी निवड झालीच असती. जय शहा यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वाढते प्रस्थ लक्षात घेता, त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत कुणी दाखवली नाही.

जय यांची बिनविरोध निवड झाल्याने आयसीसीला सर्वात तरुण अध्यक्ष मिळाला आहे. जय शहा २०१९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये दुसऱ्यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. २०२५ मध्ये त्यांच्या बीसीसीआयच्या सचिवपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे जय शहा हे १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळतील.

३५ वर्षीय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत. विशेष बाब म्हणजे ते आयसीसीचे अध्यक्ष झाल्याने बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. बीसीसीआयच्या सचिवपदी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे सुपुत्र रोहन जेटली यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र रोहन यांनीच स्वत: आपण या पदासाठी उत्सुक नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आयसीसीचे मावळते अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी २० ऑगस्ट रोजी पुन्हा आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार कळवला होता. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. शहा हे एकमेव उमेदवार असल्याने आणि त्यांची जागतिक क्रिकेटवर असलेली पकड पाहता त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ठोस पावले टाकली, असे आयसीसीने एका निवेदनात सांगितले.

आयसीसीचे भारतीय अध्यक्ष नाव कार्यकाळ

जगमोहन दालमिया १९९७-२०००

शरद पवार २०१०-२०१२

एन. श्रीनिवासन २०१४-२०१५

शशांक मनोहर २०१५-२०२०

क्रिकेट खेळ अधिक लोकप्रिय करण्याकडे लक्ष

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी माझे नामांकन झाल्यामुळे मी सर्वात भाग्यवान समजतो. आयसीसीच्या टीमसोबत जवळून काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच आयसीसीच्या सदस्य देशांसोबत काम करताना हा खेळ अधिक लोकप्रिय कसा होत जाईल, हेच आमचे यापुढचे ध्येय असणार आहे. क्रिकेट सर्वसमावेशक खेळ करण्याला आमचे प्राधान्य राहील, असे जय शहा यांनी सांगितले. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आल्याने क्रिकेटच्या वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा खेळ अधिकाधिक लोकप्रिय होत जाईल, अशी आशा मला आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in