

बाली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी जय शहा यांची दुसऱ्या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटच्या जागतिक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर नेतृत्वात सातत्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयसीसीने सोमवारी जाहीर केले.
३८ वर्षीय जय शहा यांनी यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून काम पाहिले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. रविवारी बाली येथे संपलेल्या आयसीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. या पदावर विराजमान होणारे ते आतापर्यंतचे सर्वांत तरुण अध्यक्ष आहेत.
खेळाचा जागतिक विस्तार, चाहत्यांची वाढती संख्या आणि व्यावसायिक विकास या बाबींना आयसीसीच्या धोरणात्मक आराखड्यात महत्त्वाचे स्थान आहे. अशा निर्णायक टप्प्यावर शाह यांच्या नेतृत्वावरील संचालक मंडळाचा विश्वास या निर्णयातून प्रतिबिंबित होतो, असे आयसीसीने निवेदनात म्हटले आहे.
२०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होणार असल्याने या खेळासाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत. “आयसीसीच्या संचालक मंडळाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनापासून आभारी आहे. सर्व संचालकांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणे हा माझ्यासाठी सन्मान आणि जबाबदारी दोन्ही आहे. जगभरातील क्रिकेटच्या विकासासाठी सदस्य देशांसोबत काम करण्यास मी कटिबद्ध आहे,” असे जय शहा यांनी आयसीसीच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांच्यानंतर शहा यांनी आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. यापूर्वी २०२१ ते २०२४ या कालावधीत त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्षपदही भूषवले आहे. “लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन ही आपला खेळ नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याची मोठी संधी आहे. लोकांना एकत्र आणण्याची क्षमता ही क्रिकेटची सर्वांत मोठी ताकद आहे, असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. संचालक मंडळ आणि सदस्य देशांच्या सहकार्याने महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यावर आमचा भर असेल. क्रिकेटच्या विकासासाठी केलेले प्रयत्न पुढील अनेक पिढ्यांसाठी चिरस्थायी ठरतील, याची आम्ही काळजी घेऊ,” असेही शहा म्हणाले.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनीही शहा यांच्या पुनर्नियुक्तीचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हा महत्त्वाचा काळ असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रिकेटची परंपरा जपत नव्या संधी, प्रेक्षकवर्ग आणि बदलत्या व्यावसायिक परिस्थितीशी जुळवून घेणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले.
सचिन, बिंद्रा यांच्याकडून अभिनंदन
क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी जय शहा यांचे अभिनंदन केले. क्रिकेटच्या विकासासाठी नव्या संधी निर्माण करणे, खेळाची परिसंस्था अधिक सक्षम करणे आणि नव्या प्रेक्षकांपर्यंत क्रिकेट पोहोचवणे आवश्यक आहे. या उद्दिष्टांसाठी शहा यांनी विशेषतः महिला क्रिकेटच्या विकासावर भर देत काम केले आहे, असे सचिनने म्हटले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा यानेही शहा यांचे अभिनंदन केले. त्यांच्या आगामी कार्यकाळात क्रिकेटचे ऑलिम्पिकमधील पुनरागमन ही महत्त्वाची घडामोड ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
गिल, सूर्यकुमार, हार्दिक, बुमरा यांच्याकडून शुभेच्छा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी जय शहा यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल, टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहा यांना शुभेच्छा दिल्या.
आयसीसीचे भारतीय अध्यक्ष
जगमोहन दालमिया - १९९७ ते २०००
शरद पवार - २०१० ते २०१२
एन. श्रीनिवासन - २०१४ ते २०१५
शशांक मनोहर - २०१५ ते २०२०
जय शहा - २०२४ पासून सुरू