गॉल : डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने (६८ धावांत ५ बळी) केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर ६३ धावांनी मात केली. किवी संघाच्या रचिन रवींद्रची १६८ चेंडूंतील ९२ धावांची झुंज अपयशी ठरली.
गॉल येथे झालेल्या या कसोटीतील विजयासह श्रीलंकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून उभय संघांतील दुसरी लढत २६ सप्टेंबरपासून याच मैदानात खेळवण्यात येईल. श्रीलंकेचा हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) शर्यतीत चौथा विजय ठरला. त्यामुळे ते अद्यापही अंतिम फेरी गाठू शकतात. पहिल्या डावात ४ व दुसऱ्या डावात ५ असे एकूण कसोटीत ९ बळी मिळवणाऱ्या जयसूर्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
श्रीलंकेने दिलेल्या २७५ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची ८ बाद २०७ अशी स्थिती होती. अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी ६८ धावांची, तर श्रीलंकेला फक्त २ बळींची गरज होती. रवींद्र ९१ धावांवर नाबाद होता. मात्र सोमवारी यामध्ये अवघ्या एका धावेची भर घालून रवींद्र जयसूर्याच्याच गोलंदाजीवर पायचीत झाला. मग दोन षटकांच्या अंतरात जयसूर्याने विल्यम ओरुरकेचा त्रिफळा उडवला आणि ७१.४ षटकांत २११ धावांवर न्यूझीलंडचा डाव गुंडाळला.
भारताचे अग्रस्थान कायम
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) गुणतालिकेत भारताने अग्रस्थान टिकवले आहे. भारताने बांगलादेशला पहिल्या कसोटीत २८० धावांनी धूळ चारली. भारताचे सध्या १० सामन्यांतील ७ विजयाचे ८६ गुण आहेत. भारताची टक्केवारी ७१.६७ इतकी आहे. गुणतालिकेत टक्केवारीनुसारच संघांचा क्रम ठरवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया १२ सामन्यांतील ८ विजयांच्या ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेने तिसऱ्या स्थानी झेप घेतली असून त्यांची टक्केवारी ५०.०० इतकी आहे. त्यानंतर अनुक्रमे न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश यांचा क्रमांक लागतो. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.