Commonwealth Games 2026 : भारताने खाते उघडले; झंडू कुमारने पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने एक पदक जिंकत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खाते उघडले.
Commonwealth Games 2026 : भारताने खाते उघडले; झंडू कुमारने पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक
Commonwealth Games 2026 : भारताने खाते उघडले; झंडू कुमारने पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक(Photo-X)
Published on

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने एक पदक जिंकत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खाते उघडले. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकासह जलतरण, बॉक्सिंग आणि लॉन बॉल्समध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात झंडू कुमार याने कांस्यपदक पटकावून भारताचे पदकांचे खाते उघडले. पोलिओवर मात करत आर्थिक अडचणी आणि विविध छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेल्या २८ वर्षीय झंडूने १८१ किलो आणि १९० किलो वजन यशस्वीरित्या उचलत १३०.९ गुण मिळवले. मात्र १९६ किलोचा अखेरचा प्रयत्न तो पूर्ण करू शकला नाही. याच स्पर्धेत भारताच्या सुधीर याने ११४.१ गुणांसह सहावे स्थान मिळवले.

नायजेरियाच्या इद्रिस रिलुवान (१३२.८ गुण) याने सुवर्णपदक, तर मॅथ्यू हार्डिंग (१३१ गुण) याने रौप्यपदक पटकावले.

अशोक मलिकचे पदक थोडक्यात हुकले

पुरुषांच्या लाइटवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये अशोक मलिक याला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्याने १४३.८ गुणांसह चौथे स्थान मिळवले. इंग्लंडच्या मार्क स्वान (१५३.९) याने सुवर्णपदक, नायजेरियाच्या रोलैंड एझुरुइके (१५३.९) याने रौप्य, तर मलेशियाच्या बॉनी बुन्याऊ गस्टिन (१५३.५) याने कांस्यपदक जिंकले. भारताचा परमजीत कुमार १३५.६ गुणांसह सातव्या स्थानावर राहिला.

कार्तिक बुडिगिनला पदकाची हुलकावणी

पुरुषांच्या १०० मीटर फ्रीस्टाइल एस-१३ अंतिम फेरीत भारताचा कार्तिक बुडिगिना अवघ्या एका स्थानाने पदकापासून दूर राहिला. त्याने ५७.५७सेकंदांची वेळ नोंदवत चौथे स्थान मिळवले. त्याचा सहकारी इमाम अली १:०३.७३ मिनिटांच्या वेळेसह सातवा राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या नाथन हॅड्रिक्स (५४.५४ सेकंद) याने सुवर्णपदक, स्कॉटलंडच्या स्टीफन क्लेग (५५.१६) याने रौप्य, तर इंग्लंडच्या मॅथ्यू रेडफर्न (५६.८६) याने कांस्यपदक जिंकले. एस-१३ गट हा दृष्टिदोष असलेल्या खेळाडूंसाठी राखीव आहे. यापूर्वी सकाळच्या हीटमध्ये कार्तिकने ५७.१० सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे, तर इमाम अलीने १:०५.३२ मिनिटांसह अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

जादुमनी सिंगची विजयी सुरुवात

पुरुषांच्या ५५ किलो गटातील बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या जादुमनी सिंग याने दमदार सुरुवात केली. त्याने ३२ फेरीत स्कॉटलंडच्या अॅरॉन कुलेनचा एकमताने पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुढील फेरीत त्याची गाठ पाकिस्तानच्या सुमामा रहमानशी पडणार आहे.

श्रीहरी नटराजनचे आव्हान संपले

भारताचा अव्वल जलतरणपटू श्रीहरी नटराजन याचे पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. त्याने २५.२९ सेकंदांची वेळ नोंदवत आपल्या उपांत्य फेरीत सातवे स्थान मिळवले आणि अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा पीटर कोएट्झे (२४.२९ सेकंद) सर्वात वेगवान ठरला. त्याच्यानंतर रुआर्ड व्हॅन रेनेन (२४.५६) आणि इंग्लंडचा ऑलिव्हर मॉर्गन (२४.६५) यांनी अंतिम फेरी गाठली.

लॉन बॉल्समध्ये भारताची विजयी घोडदौड

लॉन बॉल्समध्येही भारतीय खेळाडूंनी विजयी कामगिरी कायम ठेवली. महिला पेअर्स गटात रूपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेचा २-० ( xi - 8, (9 - 4) असा पराभव करत विभाग 'बी'मधील सलग दुसरा विजय मिळवला. पुरुष एकेरीत पुतुल सोनवाल यानेही सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्या दिवशी विद्यमान विश्वविजेता कॅनडाच्या रायन बेस्टरला पराभूत करणाऱ्या सोनवालने यावेळी फॉकलंड आयलंड्सच्या सेसिल अलेक्झांडरवर टाय-ब्रेकमध्ये मात केली. पहिला सेट ३-४ अशा पिछाडीवरून ७-५ असा जिंकणाऱ्या सोनवालने दुसरा सेट ६-८ असा गमावला. मात्र टाय-ब्रेकमध्ये संयम राखत त्याने सामना आपल्या नावावर केला.

पंतप्रधान मोदींकडून झंडू कुमारचे अभिनंदन

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडू झंडू कुमार याने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक पटकावून देशाच्या पदकांचा श्रीगणेशा केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झंडू कुमारचे विशेष अभिनंदन केले असून, संपूर्ण देशाला त्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. "भारताचे पदकांचे खाते उघडणाऱ्या झंडू कुमारचे खूप खूप अभिनंदन ! त्याची ही कामगिरी अथांग सामर्थ्य, अढळ निश्चय आणि वर्षांच्या शिस्तबद्ध परिश्रमाचे प्रतीक आहे. प्रत्येक आव्हानावर मात करत आंतरराष्ट्रीय मंचावर यश मिळवून त्याने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली असून अगणित भारतीयांना प्रेरित केले आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

भारतीय जलतरणपटूंची निराशाजनक कामगिरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारतीय जलतरणपटूंना अत्यंत निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला. पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात दक्षिण शशिकुमार आणि आर्यन नेहरा हे दोन्ही जलतरणपटू अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरले. टॉलक्रॉस स्विमिंग सेंटर येथे पार पडलेल्या ४०० मीटर फ्रीस्टाईलच्या प्राथमिक फेरीत एकूण २७ जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये दक्षिण शशिकुमार याने ३:५८.०९ अशी वेळ नोंदवत १५ वे स्थान मिळवले, तर आर्यन नेहरा ४:००.२६ अशा वेळेसह १६ व्या स्थानावर राहिला. हिट्सच्या तिसऱ्या शर्यतीत (हिट ३) सहभागी झालेला दक्षिण शशिकुमार शर्यतीचा निम्मा टप्पा पार करताना सातव्या क्रमांकावर पोहोचला होता, परंतु अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आवश्यक असलेली गती तो कायम ठेवू शकला नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in