जो रूट क्रिकेटच्या इतिहासातला १० हजार धावा पूर्ण करणारा चौदावा खेळाडू

जो रूट क्रिकेटच्या इतिहासातला १० हजार धावा पूर्ण करणारा चौदावा खेळाडू

इंग्लंडचा जो रूट हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला १० हजार धावा पूर्ण करणारा चौदावा खेळाडू ठरला आहे. त्याने नुकत्याच खेळल्या गेलेल्या लॉर्ड्स‌ कसोटीत इंग्लंडची ६९ वर चार बाद अशी नाजूक स्थिती असताना सहाव्या विकेटसाठी बेन फोक्सबरोबर १२० धावांची शानदार भागीदारी करून इंग्लंडला हा कसोटी सामना पाच विकेट्स‌ने जिंकून दिला. संयम आणि फटकेबाजीची अचूक निवड करून जो रूटने ३२८ मिनिटे खेळपट्टीवर किल्ला लढवत त्यात १७० चेंडूंचा सामना करत नाबाद ११५ धावा काढल्या. रूटचे हे कसोटीतले २६वे शतक ठरले. याच शतकावेळी रूटच्या क्रिकेट कारकीर्दीतल्या १० हजार धावा पूर्ण झाल्या.

या १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याने २१८ डाव घेतले. ज्या १४ क्रिकेटपटूंनी १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी किती डाव घेतले ती यादी क्रमवार आम्ही इथे देत आहोत, ब्रायन लारा (१९५ डाव), सचिन तेंडुलकर (१९५ डाव), कुमार संगकारा (१९५ डाव), रिकी पाॅण्टिंग (१९६ डाव), राहुल द्रविड (२०६ डाव), युनिस खान (२०८ डाव), महेला जयवर्धने (२१० डाव), सुनील गावसकर (२१२ डाव), जॅक कॅलीस (२१७ डाव), जो रूट (२१८ डाव), अॅलिस्टर कूक (२२९ डाव), अॅलन बॉर्डर (२३५ डाव), शिवनरीन चंदरपॉल (२३९ डाव) अाणि स्टीव्ह वॉ (२४४ डाव). जो रूट या १० हजारी यादीत आता मानाने सामील झाला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात २०१२ला केली होती. कालावधीच्या हिशोबाने बघायचे झाले तर पदार्पणापासून तो १० हजार धावांपर्यंतच्या प्रवासासाठी जो रूटनेच सर्वात कमी कालावधी घेतला आहे. या रेकॉर्डमधले टॉप पाच खेळाडू असे आहेत, जो रूट (इंग्लंड, २१८ डाव, नऊ वर्षे १७१ दिवस), अॅलिस्टर कूक (इंग्लंड, २२९ डाव, १० वर्षे ८७ दिवस), राहुल द्रविड (भारत, २०६ डाव, ११ वर्षे २८० दिवस), कुमार संगकारा (श्रीलंका, १९५ डाव, १२ वर्षे १५९ दिवस), रिकी पॉण्टिंग (आॅस्ट्रेलिया, १९६ डाव, १२ वर्षे १७४ दिवस).

जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास गेली १० वर्षे खेळतोय. त्याच्या कसोटी कारकीर्दीतले जर तीन टप्पे बघायचे झाले तर त्यात पहिला टप्पा आणि तिसरा टप्पा खूप महत्त्वाचा ठरला आहे. २०१२ ते २०१७ पर्यंत खेळताना जो रूटने ६४ कसोटीत ५२.४५ च्या सरासरीने आणि १३ शतकांच्या मदतीने ५५६० धावा काढल्या आहेत. हा त्याच्या कारकीर्दीतला पहिला टप्पा खूपच शानदार ठरला. दुसऱ्या टप्प्यात जो रूट थोडासा फलंदाजीत मंदावलेला पाहायला मिळाला. त्याने या दुसऱ्या टप्प्यातल्या २००८ ते २०२०च्या कालावधीत खेळलेल्या एकूण ३३ कसोटीत ३९.७०च्या सरासरीने आणि चार शतकांच्या मदतीने २,२६३ धावा आपल्या खात्यात जोडल्या आहेत. त्यानंतर २०२१पासून तो अगदी आत्ताच्या लॉर्ड्स‌ कसोटीपर्यंतच्या कालावधीत जो रूटने शानदार जोर लावत २१ कसोटीत ५६.२०च्या दमदार सरासरीने आणि नऊ शतकांच्या मदतीने २१९२ धावा काढल्या. जो रूटचे सध्याचे वय आहे ३२. अजूनही तो किमान तीन-चार वर्षे तरी हमखास कसोटी क्रिकेट खेळू शकणार आहे. आत्तापर्यंत त्याने ११८ कसोटीतल्या २१८ डावांमध्ये ४९.५७च्या सरासरीने १०,०१५ धावा काढल्या असून, यात त्याच्या २६ शतकांचा आणि ५३ अर्धशतकांचा समावेश आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे इंग्लंडच्या घरच्या खेळपट्ट्यांवर खेळताना केविन पीटरसन, इयॉन बेल, ग्रॅहम गूच, अॅलिस्टर कूक या चारही क्रिकेटपटूंनी समानपणे सर्वाधिक प्रत्येकी १५ शतके झळकावली आहेत. आता त्याचीही जो रूटने बरोबरी साधली आहे. त्यानेही इंग्लंडमध्ये खेळताना ६० कसोटीत ५२.९३च्या सरासरीने ५१३५ धावा जमवताना त्यात १५ शतक झळकावली आहेत. जो रूटने परदेशात ५५ कसोटी सामने खेळले असून, त्यात त्याला ४५.९३च्या सरासरीने आणि ११ शतकांच्या मदतीने ४५९३ धावा जमवता आल्या आहेत. न्यूट्रल ठिकाणी मात्र रूटने तीन कसोटीत खेळताना ५७.४०च्या सरासरीने २८७ धावांची मदत इंग्लंड संघाला दिली आहे.

जो रूट गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये राजासारखा खेळला. १५ कसोटीतल्या २९ डावांत त्याने ६१च्या शानदार सरासरीने १७०८ धावा गेल्या वर्षी काढल्या होत्या; पण त्याच वर्षात फॉर्म दाखवूनसुद्धा कसोटी सामन्यांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवांमुळे त्याला नेतृत्व सोडण्यासाठी सांगितले गेले; पण ती निराशा स्वीकारूनसुद्धा जो रूट नमला नाही. त्याने आपली फलंदाजीतली जबाबदारी यावर्षीदेखील तितक्याच गंभीरतेने उचललेली पाहायला मिळतेय. २०२२मध्ये त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या सहा कसोटीतल्या १२ डावांमध्ये ४४च्या सरासरीने ४८४ धावा काढल्या आहेत. यातही त्याच्या तीन शतकांचा समावेश आहे.

संघाचे नेतृत्व करताना त्याच्या फलंदाजीवर कधीच परिणाम झाला नाही आणि आता नेतृत्वातून मुक्त झाल्यानंतरही जो रूट फलंदाजीत त्याच गतीने पुढे जाताना पाहायला मिळतोय. त्याच्या उपस्थितीत इंग्लंड संघाला ज्या ४८ कसोटीत विजय मिळवता आलेत, त्या ४८ कसोटीत जो रूटने इंग्लंड संघाला ६५.४०च्या सरासरीने ५०३६ धावांची मदत केली आहे. त्यात त्याच्या १८ शतकांचा आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. जो रूट ज्या जिद्दीने सध्या खेळतोय, ते पाहता पुढच्या दोन-तीन वर्षांत नक्कीच तो कसोटी क्रिकेटमधील आणखी काही रेकॉर्ड मोडताना दिसू शकतो. कदाचित, अॅलिस्टर कूकला मागे टाकून तो इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील नंबर वन खेळाडूही होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in