जो रुट नंबर वन तरीही टीकेचा बळी

जो रुट नंबर वन तरीही टीकेचा बळी
Published on

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅहम गूच हा १९९५ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यावेळी इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी धावांचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर लागला होता. त्याने ११८ कसोटीत ४२.५८च्या सरासरीने ८,९०० धावा काढल्या होत्या. त्यात त्याच्या २० शतकांचा समावेश आहे. त्याचा हा सर्वाधिक कसोटी धावांचा रेकॉर्ड २३ वर्षांच्या गॅपने अॅलिस्टर कूकने मोडला. कूकने १६१ कसोटीत ४५.३५च्या सरासरीने १२,४७२ धावा काढल्या. यात त्याच्या ३३ शतकांचा समावेश आहे. गूचचा रेकॉर्ड तोडायला जिथे २३ वर्षांचा कालावधी लागला, तिथेच आता अॅलिस्टर कूकचा रेकॉर्ड तोडायला तेवढा मोठा कालावधी लागण्याची शक्यता कमीच दिसतेय. कारण इंग्लंडचा जो रूट हा कूकच्या रेकॉर्डजवळच आला आहे. त्याने ११७ कसोटीत ४९.१९च्या सरासरीने आणि २५ शतकांच्या मदतीने आत्तापर्यंत ९,८८९ धावा काढल्या आहेत. याचा अर्थ इंग्लंड कसोटी क्रिकेटमधला कूकचा सर्वाधिक कसोटी धावांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी जो रूटला आता फक्त २,५८४ धावांची गरज आहे. जो रूटचे सध्याचे वय ३२ असून अजूनही तो इंग्लंडकडून तीन-चार वर्षे सहज खेळू शकतो. मुळात सध्या इंग्लंडमध्ये जो रूटला धरून जी टीका सुरू आहे, त्याला काही अर्थच राहिलेला नाही. गेल्या १७ कसोटीत जर इंग्लंडला एकच विजय मिळाला असेल तर तो एकट्या जो रूटचा दोष नक्कीच नाही. उलट जो रूटने स्वत: २०२१ला १५ कसोटीत खेळताना ६१च्या मजबूत सरासरीने संघासाठी १,७०८ धावा काढल्या होत्या. त्याने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली होती; पण त्याला संघ सहकाऱ्यांची साथ मिळू शकली नाही. आजच्या घडीला इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सफल कर्णधार म्हणून जो रूटचेच नाव घेतले जाते. कारण त्याच्याच नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंड कसोटी संघाला सर्वात जास्त विजय मिळवता आले आहेत. त्याच्या एकूण ६४ कसोटी नेतृत्वात इंग्लंडला २७ विजय आणि २६ पराभव स्वीकारावे लागले अाहेत. त्याच्या खालोखाल मायकल वॉनच्या नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंडला ५१ कसोटीत २६ विजय मिळवता आले आहेत. बाकी अॅन्ड्र‌्यू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ५० कसोटीत २४ आणि अॅलिस्टर कूकच्या ५९ कसोटीतल्या नेतृत्वात २४ विजय इंग्लंड संघाला मिळवता आले आहेत. म्हणजे या यादीत नंबर वनला जो रूटच आहे. तरीसुद्धा तो टीकेचा धनी ठरला आहे.

सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त विजय, असे असतानाही जो रूटला सध्या इंग्लंड क्रिकेटमध्ये चुकीची वागणूक दिली जात आहे. जे भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या बाबतीत घडले, तेच इंग्लंडमध्ये जो रूटच्या बाबतीतही घडले आहे. संघासाठी खपूनसुद्धा त्याला मनस्ताप सहन करावा लागला आहे. तरीसुद्धा आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे शांत असून नवा कर्णधार बेन स्टोक्सच्या हाताखाली खेळायला तो तयार झाला आहे. २ जूनपासून इंग्लंडमध्येच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. जो रूटने त्यासाठी स्वत:ला मागचेे सगळे विसरून तयार करून घेतले आहे. न्यूझीलंडविरुद्धचा त्याचा कसोटी रेकॉर्ड चांगलाच आहे. यापूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या १३ कसोटीत ६१.३३ च्या सरासरीने ९९२ धावा काढल्या आहेत. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या घरच्या खेळपट्ट्यांवर कसोटीत सर्वात जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रूटचा तिसरा क्रमांक लागतो. त्याच्या अगोदरचे दोन खेळाडू या यादीत असे आहेत, अॅलिस्टर कूक आणि ग्रॅहम गूच. कूकने इंग्लंडमध्ये खेळलेल्या ८९ कसोटीत १५ शतकांच्या सहाय्याने आणि ४४ च्या सरासरीने इंग्लंडतर्फे सर्वाधिक ६,५६८ धावा काढल्या आहेत. तर ग्रॅहम गूचने इंग्लंडमध्ये खेळलेल्या ७४ कसोटीत ४६.२२ च्या सरासरीने आणि १५ शतकांच्या मदतीने ५,९१७ धावा काढल्या. जो रूटला ५९ कसोटीत ५२.१७ च्या सरासरीने आणि १४ शतकांच्या मदतीने इंग्लंडमध्ये ५,००९ धावा जमवता आल्या आहेत. इंग्लंडचे हे तीनच खेळाडू इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर कसोटीत पाच हजारपेक्षा जास्त धावा काढू शकले आहेत. कदाचित, या रेकॉर्डमध्येही काही दिवसांनी जो रूट नंबर वनवर गेलेला पाहायला मिळू शकतो.

जो रूटने इंग्लंड कसोटी क्रिकेटला आपल्या परीने बहुमूल्य असे योगदान दिले आहे. असे असतानाही सध्या त्याच्या बाबतीत इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेगळी भूमिका घेऊन इंग्लंडच्या अपयशाचे खापर त्याच्यावरच फोडले आहे; पण रूटच्या जागेवर आलेला इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार बेन स्टोक्ससुद्धा सावध झाला आहे. म्हणून त्याने आल्या आल्या संघात काही बदल करवून घेतले. संघ सहकाऱ्यांची साथ मिळावी म्हणून त्याने आपल्याला हवे तसे खेळाडू संघात घेतले आहेत. गटबाजी, राजकारण या दोन गोष्टींचीच दगाबाजी होऊ शकते, याचे भान बेन स्टोक्सला आहे. ते भान जो रूटला नव्हते, म्हणूनच तो या सगळ्याला बळी गेला. बेन स्टोक्स मात्र पावले जपून टाकतोय.

logo
marathi.freepressjournal.in