बटलरच्या शतकामुळे राजस्थानकडून विक्रमी पाठलाग

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत ६ बाद २२३ धावांचा डोंगर उभारला. सुनील नरिनने शतकी धुमाकूळ घालताना ५६ चेंडूंत १०९ धावा केल्या. मग लक्ष्याचा पाठलाग करताना एकामागून एक फलंदाज बाद होत असतानाही बटलरने या हंगामातील दुसरे व आयपीएल कारकीर्दीतील सातवे शतक साकारले.
बटलरच्या शतकामुळे राजस्थानकडून विक्रमी पाठलाग
Published on

कोलकाता : जोस बटलरने (६० चेंडूंत नाबाद १०७ धावा) तो टी-२०तील सर्वोत्तम फलंदाज का आहे, हे मंगळवारी रात्री पुन्हा दाखवून दिले. बटलरने साकारलेल्या जिगरबाज शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला २ गडी राखून नमवले. कोलकाताने दिलेले २२४ धावांचे लक्ष्य राजस्थानने अखेरच्या चेंडूवर गाठले. आयपीएलच्या इतिहासातील हा विक्रमी धावांचा पाठलाग ठरला.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत ६ बाद २२३ धावांचा डोंगर उभारला. सुनील नरिनने शतकी धुमाकूळ घालताना ५६ चेंडूंत १०९ धावा केल्या. मग लक्ष्याचा पाठलाग करताना एकामागून एक फलंदाज बाद होत असतानाही बटलरने या हंगामातील दुसरे व आयपीएल कारकीर्दीतील सातवे शतक साकारले. त्याने ९ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली. विशेषत: बटलरने अर्धशतक ३६ चेंडूंत पूर्ण केले होते. मात्र त्यानंतर त्याने धावांची गती वाढवली. रियान पराग (३४) व रोवमन पॉवेल (२६) यांनी बटलरला चांगली साथ दिली. राजस्थानचा हा सात सामन्यांतील सहावा विजय ठरल्याने त्यांनी अग्रस्थान कायम राखले. कोलकाताचा हा दुसरा पराभव ठरला.

षटकांच्या संथ गतीसाठी श्रेयसला १२ लाखांचा दंड

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरला षटकांच्या संथ गतीसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानविरुद्धच्या लढतीत कोलकाताने निर्धारीत वेळेत १ षटक कमी टाकले. कोलकाताची ही संथ गतीची पहिलीच वेळ असल्याने श्रेयसला १२ लाखांचा दंड भरावा लागला. पुढील वेळेस त्याला २४ लाख भरावे लागू शकतात. तर तिसऱ्या वेळेस एका सामन्याच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. आतापर्यंत दिल्लीच्या ऋषभ पंतला दोनदा, तर राजस्थानच्या संजू सॅमसनला एकदा षटकांच्या संथ गतीचा दंड बसला आहे.

विराट, धोनीप्रमाणे सामने जिंकवून देण्याचा प्रयत्न

विराट व धोनी यांनी आयपीएल तसेच भारतीय संघाला अखेरच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर उभे राहून अनेक सामने जिंकवून दिले आहेत. त्याचेच अनुकरण करण्याचा मी प्रयत्न केला, असे सामनावीर बटलर म्हणाला. “३६ चेंडूंत ९६ धावांची आवश्यकता असतानाही आम्ही आशा सोडल्या नाहीत. पॉवेलने फटकेबाजी सुरू केल्यावर माझाही आत्मविश्वास बळावला. अखेरच्या षटकापर्यंत थांबलो तर धावा होतील, याची खात्री होती. अर्धशतक होईपर्यंत मी काहीसा संघर्ष करत होतो. मात्र धोनी, कोहलीने यापूर्वी असे अनेकदा करून दाखवले आहे. मीसुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळवली व टिकून राहिलो,” असे बटलर म्हणाला.

आयपीएल गुणतालिका

संघ - सामने - जय - पराजय - गुण - धावगती

  • राजस्थान - ७ - ६ - १ - १२ - ०.६७७

  • कोलकाता - ६ - ४ - २ - ८ - १.३९९

  • चेन्नई - ६ - ४ - २ - ८ - ०.७२६

  • हैदराबाद - ६ - ४ - २ - ८ - ०.५०२

  • लखनऊ - ६ - ३ - ३ - ६ - ०.०३८

  • गुजरात - ६ - ३ - ३ - ६ - -०.६३७

  • पंजाब - ६ - २ - ४ - ४ --०.२१८

  • मुंबई - ६ - २ - ४ - ४ - -०.२३४

  • दिल्ली - ६ - २ - ४ - ४ - -०.९७५

  • बंगळुरू - ७ -१ - ६ - २ - -१.१८५

(राजस्थान वि. कोलकाता सामन्यापर्यंत)

logo
marathi.freepressjournal.in