आशियाई वर्चस्वासाठी आजपासून जुगलबंदी; भारतापुढे पहिल्याच लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान

यंदा हे या स्पर्धेचे १८वे पर्व असून भारतीय संघ पाचव्यांदा या स्पर्धेत खेळणार आहे. १९६४मध्ये भारताने या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते
आशियाई वर्चस्वासाठी आजपासून जुगलबंदी; भारतापुढे पहिल्याच लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान

दोहा : भारतीय फुटबॉल संघ २०२६च्या फिफा विश्वचषकाला पात्र ठरण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. मात्र यापूर्वी त्यांना आशियातील प्रस्थापितांना धक्का द्यावा लागणार आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ शनिवारी एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. कतार येथील अहमद बिन अली स्टेडियमवर ही लढत होईल.

भारताने २०२३या वर्षात आंतरखंडीय चषक तसेच सॅफ चषक फुटबॉल स्पर्धा जिंकून विश्वचषक पात्रतेचा पहिला टप्पा पार केलेला आहे. पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यात कुवैत, कतार यांच्याकडून भारताला पराभव पत्करावा लागला. आता दुसऱ्या लेगला फेब्रुवारीत प्रारंभ होईल. त्यापूर्वी भारतीय संघाला आशियात स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी आहे. दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, जपान यांसारख्या देशांना कडवी झुंज देऊन ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान व सिरिया यांच्यासह ब-गटात समावेश करण्यात आला असून हे सर्व संघ क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी आहेत.

यंदा हे या स्पर्धेचे १८वे पर्व असून भारतीय संघ पाचव्यांदा या स्पर्धेत खेळणार आहे. १९६४मध्ये भारताने या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. त्यावेळी फक्त ४ संघांचा समावेश होता. त्यानंतर भारताला (२०११, २०१९) एकदाही बाद फेरी गाठता आलेली नाही. भारतीय संघ यावेळी मात्र नक्कीच बाद फेरी गाठेल, अशी अपेक्षा फुटबॉलप्रेमींना आहे.

भारतासाठी सर्वाधिक ९३ गोल करणारा ३९ वर्षीय सुनील संपूर्ण स्पर्धेत कशी कामगिरी करतो, यावरच संघाचे भवितव्य अवलंबून असेल. छेत्री तिसऱ्यांदा या स्पर्धेत खेळत असून त्याने या स्पर्धेतील ४ सामन्यांत ६ गोल नोंदवले आहेत. प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच यांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले आहे. मात्र तूर्तास तरी ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड आहे. अन्वर अली, जेक्सन सिंग व आशिक हे खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार आहेत. त्यामुळे अनुभवी संदेश झिंगण व गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूवर संघाच्या आशा असतील.

logo
marathi.freepressjournal.in