कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा भारताचा जर्मनीकडून उपांत्य फेरीत पराभव!

सहा वेळच्या विजेत्या जर्मनीने मात्र मिळालेल्या दोन्ही पेनल्टी कॉर्नर्सचा पूरेपूर लाभ उचलत दोन्ही वेळेस गोल केले.
कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा भारताचा जर्मनीकडून उपांत्य फेरीत पराभव!
PM

क्वालालम्पूर : कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या (२१ वर्षांखालील) उपांत्य फेरीत भारतीय युवा संघाला जर्मनीकडून १-४ असा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

मलेशिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत क-गटातून दुसऱ्या स्थानासह सर्वप्रथम आगेकूच केली होती. मग उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी नेदरलँड्सवर ०-२ अशा पिछाडीवरून ४-३ अशी मात केली. त्यामुळे या सामन्यात भारत जर्मनीला कडवी झुंज देईल, असे अपेक्षित होते. मात्र संपूर्ण लढतीत भारताने १२ पेनल्टी कॉर्नर्सवर गोल करण्याची संधी गमावली. याचा फटका अखेरीस संघाला बसला. सहा वेळच्या विजेत्या जर्मनीने मात्र मिळालेल्या दोन्ही पेनल्टी कॉर्नर्सचा पूरेपूर लाभ उचलत दोन्ही वेळेस गोल केले.

भारताकडून सुदीप चिरमाकोने ११व्या मिनिटाला एकमेव गोल केला. जर्मनासठी बेन हॅशने आठव्या व ३०व्या मिनिटाला दोन, तर पॉल ग्लेंडर व फ्लोरीन स्पेर्लिंग यांनी अनुक्रमे ४१ आणि ५८व्या मिनिटाला एकेक गोल नोंदवून जर्मनीचा विजय साकारला. अंतिम फेरीत जर्मनीची शनिवारी फ्रान्सशी गाठ पडेल. फ्रान्सने दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेनला ३-१ असे नमवले. भारतीय संघ शनिवारीच कांस्यपदकासाठी स्पेनशी दोन हात करणार आहे.

 २-सलग दुसऱ्या विश्वचषकात जर्मनीकडूनच भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. २०२१च्या विश्वचषकातही जर्मनीने भारताला ४-२ असे नमवले होते.

logo
marathi.freepressjournal.in