बंगळुरू : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर करुण नायरवर दबाव वाढला होता. मात्र भारताचा हा फलंदाज या मालिकेबद्दल सकारात्मक आहे. इंग्लडविरुद्धच्या मालिकेमुळे माझ्या अनुभवात वाढ झाली असून भारतीय संघात पुन्हा संधी मिळाल्यास अनुभवाचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकतो, असे नायर म्हणाला.
करुण नायरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रभावी कामगिरी करता आली नाही. अँडरसन तेंडुलकर मालिकेत नायरने ८ डावांत २५.६२ च्या सरासरीने केवळ २०५ धावा जमवल्या. त्यात ओव्हलवर जमवलेल्या ५७ धावा ही मालिकेतील त्याची सर्वाधिक खेळी ठरली.
त्याने मालिकेतील अन्य डावांत ४०, ३१, २६ आणि २१ अशा धावांच्या खेळी खेळल्या. त्यात त्याने चांगली सुरुवात केली. पण त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात नायरला अपयश आले. त्यावर नायर म्हणाला की, इंग्लंडमध्ये मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो. बऱ्याचदा आपल्याला चांगली सुरुवात मिळते, मात्र एखाद्या चुकीमुळे आपण बाद होतो. इंग्लंडमध्ये माझ्यासोबत तेच घडले, असे नायरने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. परंतु आता त्यात सुधारणा करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला. त्यावर नायर म्हणाला की, चांगली सुरुवात मिळाल्यावर त्याचे मोठ्या खेळीत कसे रूपांतर करावे याबाबत मी जाणकारांशी चर्चा केली आहे. त्यांनी मला काही सल्ले दिले आहेत. लवकरच मी त्यावर काम सुरू करणार आहे, असे तो म्हणाला. कर्णधार शुभमन गिल याचे नेतृत्व आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संक्रमण काळात योग्य मार्गावर आहे, असे नायरला वाटते.
मालिकेत आम्ही चांगली कामगिरी केली. पण महत्त्वाचे म्हणजे त्यात सातत्य ठेवण्यात अपयशी ठरलो. ज्या चुका झाल्यात त्या सुधारायला हव्यात. आम्ही खेळाडू दिवसेंदिवस सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आशा आहे की आम्ही कसोटी सायकलमध्ये चांगली कामगिरी करू, असे नायर म्हणाला.
कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांचा टीमसोबत स्पष्ट संवाद होता. भारतीय संघाची वृत्ती ही लढाऊ असून आम्ही या मालिकेत लढत राहिलो. तुम्हाला खेळाडूंच्या आणि टीमच्या वृत्तीचा अनुभव मालिकेत दिसून आला. मी म्हटल्याप्रमाणे, ही फक्त सुरुवात आहे. यापुढे संघाच्या कामगिरीत आणखी सुधारणा होईल. मला आशा आहे की, या मालिकेतील चुकांमधून आम्ही शिकू, असे नायर म्हणाला.
आगामी काळात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट
मालिका बरोबरीत सुटल्याबाबत नायर म्हणाला की, मालिका चांगलीच झाली. ५ सामन्यांची मालिका खेळायला मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण फार कमी संघांनी इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली असल्याचे नायर म्हणाला.