गंभीरमुळे आत्मविश्वास उंचावला : करुण

एकीकडे रोहित-विराट यांच्या कसोटीतील निवृत्तीमागे भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरला कारणीभूत पकडले जाते. तसेच आता गंभीरच त्यांना एकदिवसीय संघातूनही काढून टाकणार असल्याची चर्चा आहे. मात्र भारताच्या कसोटी संघातील फलंदाज करुण नायरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील साधारण कामगिरीनंतर गंभीरचे आभार मानले आहेत.
गंभीरमुळे आत्मविश्वास उंचावला : करुण
Published on

नवी दिल्ली : एकीकडे रोहित-विराट यांच्या कसोटीतील निवृत्तीमागे भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरला कारणीभूत पकडले जाते. तसेच आता गंभीरच त्यांना एकदिवसीय संघातूनही काढून टाकणार असल्याची चर्चा आहे. मात्र भारताच्या कसोटी संघातील फलंदाज करुण नायरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील साधारण कामगिरीनंतर गंभीरचे आभार मानले आहेत.

३३ वर्षीय करुणने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेद्वारे तब्बल ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच करुणने कसोटीत त्रिशतक झळकावले होते. मात्र त्यानंतर त्याने संघातील स्थान गमावले. आता नुकताच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील ४ सामन्यांत करुणने फक्त एका अर्धशतकासह २०५ धावा केल्या. मात्र या मालिकेदरम्यान गंभीर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, असे करुणने सांगितले.

“ओव्हल येथे मी ५७ धावांची खेळी साकारली. तेथे मला शतकाचे रूपांतर करता न आल्याची खंत होती. एकंदर ही मालिका माझ्या अपेक्षेनुसार गेली नाही. संघाला गरज असताना माझ्याकडून मोठी खेळी साकारली गेली नाही. मात्र या काळात गंभीरने सातत्याने माझ्याशी संवाद साधला,” असे करुण म्हणाला.

“भारतीय संघ स्थित्यंतराच्या काळात आहे. या संघात सर्व युवा फलंदाज असताना आपले स्थान कसे टिकेल, याचा विचार न करता आपल्या अनुभवाचा संघाला कसा लाभ होईल, यावर लक्ष देण्याचे गंभीरने सुचवले,” असेही करुणने नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in