जागतिक जेतेपद जिंकतच राहू! भारताचा कर्णधार रोहित शर्माला विश्वास; तारांकितांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न

भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाचे मिळवलेले जेतेपद ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे हा संघ इतक्या सहज थांबणारा नाही. यापुढेही आयसीसी स्पर्धांसह महत्त्वाच्या मालिकांचे जेतेपद मिळवत राहू, असा विश्वास भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.
जागतिक जेतेपद जिंकतच राहू! भारताचा कर्णधार रोहित शर्माला विश्वास; तारांकितांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न
@BCCI/X
Published on

ऋषिकेश बामणे/मुंबई

एकदा का तुम्ही यशाची चव चाखली, की तुम्हाला पुन्हा यश संपादन करेपर्यंत समाधान लाभत नाही. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाचे मिळवलेले जेतेपद ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे हा संघ इतक्या सहज थांबणारा नाही. यापुढेही आयसीसी स्पर्धांसह महत्त्वाच्या मालिकांचे जेतेपद मिळवत राहू, असा विश्वास भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.

मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये पार पडलेल्या सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यासाठी रोहित उपस्थित होता. यावेळी रोहितलाच वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. बीसीसीआयचे सचिव जय शहा, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या असंख्य सध्याचे भारतीय क्रिकेटपटू या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. जुलै २०२३ ते जून २०२४च्या काळातील कामगिरीच्या आधारावर हे पुरस्कार देण्यात आले.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने जून महिन्यात टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. भारताने २००७ नंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला, तर २०१३नंतर प्रथमच भारताला एखादी आयसीसी स्पर्धा जिंकण्यात यश आले. या विजयानंतर रोहितसह विराट कोहली, रवींद्र जडेजा या अनुभवी त्रिकुटाने टी-२०तून निवृत्ती जाहीर केली. त्याच पार्श्वभूमीवर रोहितने विविध मुद्द्यांवर मत मांडले.

“कर्णधार म्हणून मी पाच वेळा आयपीएल जिंकू शकलो, याचे एक विशेष कारण आहे. मी एका जेतेपदाने कधीच समाधानी होत नाही. एकदा तुम्ही जागतिक स्पर्धा जिंकली, की त्यामध्ये सातत्य टिकवणे महत्त्वाचे आहे. सध्याचा भारतीय संघ हा जेतेपदासाठी भुकेला आहे. या संघातील वातावरण उत्तम असून अनेकांची विचारसरणी समान आहे. त्यामुळे आम्ही यापुढेही जागतिक जेतेपदांसह महत्त्वाच्या मालिका जिंकत राहू,” असे रोहित म्हणाला.

पुढील २-३ वर्षांत चॅम्पियन्स ट्रॉफी, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक अशा महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा आहेत. यादरम्यान डिसेंबरमध्ये होणारी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकाही आहे. त्यामुळे रोहितने सध्या या स्पर्धांवर लक्ष असल्याचे सांगितले.

‘त्या’ तीन स्तंभांचा मला सातत्याने पाठिंबा!

एकदिवसीय विश्वचषक २०२३ ते टी-२० विश्वचषक २०२४ या काळात मला तीन स्तंभांनी पूर्ण पाठिंबा दिला. ते म्हणजे बीसीसीआयचे सचिव जय शहा, प्रशिक्षक द्रविड आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, असे रोहितने नमूद केले. “२०२२च्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत आम्ही पराभूत झालो. तेथून पुढे संघाला जिंकण्याची सवय लावायची असेल, तर खेळण्याची शैली बदलावी लागेल, हा विचार मी संघासमोर मांडला. खेळाडूंसह बीसीसीआयने व प्रशिक्षकांनी मला पाठिंबा दिला. अजित भाई जेव्हा निवड समितीवर आले, त्यांनी ही मला हवा तो संघ दिला. त्यामुळे या तिघांचा मी सदैव ऋणी राहीन,” असे रोहित म्हणाला.

Instagram

रोहित शर्मा आणि जय शहा यांनी गुरुवारी टी-२० विश्वचषकासह मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिराला भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.

logo
marathi.freepressjournal.in