नीरजवर देशवासियांच्या आशा टिकून,जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेला आजपासून सुरुवात

फिनलंड येथील स्पर्धेत ८९.३० मीटर लांब भालाफेक केली.
नीरजवर देशवासियांच्या आशा टिकून,जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेला आजपासून सुरुवात

नीरज चोप्रा. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी भालाफेकीद्वारे ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून भारताचा तिरंगा डौलाने फडकावणारा नीरज आता घराघरात पोहोचला आहे. त्याच नीरजवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत तमाम देशवासियांच्या आशा टिकून आहेत.

गतवर्षी ऑगस्टमध्ये नीरजने ऑलिम्पिक पदक जिंकले. त्यानंतरही त्याने मागे वळून न पाहता यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी सुरुच ठेवली. फिनलंड येथील स्पर्धेत ८९.३० मीटर लांब भालाफेक केली. तर ३० जून रोजी डायमंड लीगमध्ये त्याने तब्बल ८९.९४ अंतर गाठले. त्यामुळे आता नीरजकडून ९० मीटर अंतर पार होणार का, याकडे अवघ्या क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे. नीरजला प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीचीसुद्धा जाणीव असल्याने तो नक्कीच पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल, यात शंका नाही. नीरजने येथेही पदक जिंकल्यास जागतिक स्पर्धेत पदक पटकावणारा तो भारताचा पहिला पुरुष आणि एकंदर दुसरा क्रीडापटू ठरेल. या स्पर्धेतील कामगिरी नीरजला बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी प्रोत्साहन देणारी ठरेल. २१ जुलै रोजी भालाफेकीच्या प्राथमिक फेऱ्या होणार असून पुढील दोन दिवसांत अंतिम फेरी रंगेल. भारताने या स्पर्धेसाठी २२ जणांचा संघ जाहीर केला असून गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूरवरही चाहत्यांचे लक्ष लागून आहे. नीरजव्यतिरिक्त लांब उडीपटू मुरली श्रीशंकरकडूनही पदकाच्या आशा आहेत. एप्रिलमधील फेडरेशन चषकात मुरलीने ८.३६ मीटर लांब सूर मारून लक्ष वेधले होते. शुक्रवारी तो पात्रता फेरीत खेळताना दिसेल. त्याशिवाय जेस्विन अल्ड्रीनही या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करेल.

logo
marathi.freepressjournal.in