केन विल्यम्स आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप

केन विल्यम्स आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप

केन विल्यम्सन यावेळच्या आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप ठरला. सनरायझर्स हैदराबाद संघाचा तो कर्णधार होता. त्याला १३ सामन्यांमध्ये १९.६४ च्या सरासरीने फक्त २१६ धावाच काढता आल्या. १४ कोटींची बोली लागलेल्या या खेळाडूने आपल्या संघाला पूर्णपणे निराश केले. यापूर्वी २०१६ आणि २०१९ मधल्या आयपीएल स्पर्धेत विल्यम्सनने असेच निराश केले होते. २०१६ला त्याने सहा सामन्यांमध्ये २०.६६च्या सरासरीने १२४ धावा काढल्या होत्या. तर २०१९ला त्याला नऊ सामन्यांमध्ये २२.२८च्या सरासरीने १५६ धावा काढता आल्या. केन विल्यम्सन आयपीएलमध्ये २०१५ पासून खेळतोय. त्याने या स्पर्धेत तेव्हापासून ते २०२२पर्यंत खेळलेल्या एकूण ७६ सामन्यांमध्ये ३६.२२च्या सरासरीने २१०१ धावा जमवल्या आहेत. त्याच्यासाठी आयपीएलचे सर्वोत्तम वर्ष २०१८ ठरले होते. त्याचवर्षी त्याने १७ सामन्यांमध्ये खेळताना ५२.५०च्या सरासरीने ७३५ धावा काढल्या होत्या. त्याच्या खालोखाल २०२१ला म्हणजेच गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये विल्यम्सनला १२ सामन्यांमध्ये ४५.२८च्या सरासरीने ३१७ धावा काढता आल्या. यावेळेस मात्र केन विल्यम्सनने सनरायझर्स हैदराबाद संघाला पूर्णपणे निराश केले.

केन विल्यम्सन हा न्यूझीलंड क्रिकेटमधला सध्याचा नंबर वन क्रिकेटर मानला जातो. लवकरच न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटमधला सर्वात जास्त धावा काढणारा खेळाडू ठरू शकतो. न्यूझीलंड क्रिकेटमध्ये सर्वात जास्त कसोटी धावा रॉस टेलरने काढल्या आहेत. त्याने ११२ कसोटीतल्या १९६ डावांमध्ये खेळताना ४४.६६च्या सरासरीने आणि १९ शतकांच्या मदतीने सर्वाधिक ७,६८३ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. त्याच्या खालोखाल केन विल्यम्सनने ९६ कसोटीतल्या १५० डावांमध्ये खेळताना ५३.४७ च्या सरासरीने आणि २४ शतकांच्या मदतीने ७,२७२ धावा जमवल्या आहेत. टेलरचा सर्वाधिक कसोटी धावांचा रेकॉर्ड तोडायला आता केन विल्यम्सनला ४१२ धावांची गरज आहे. विल्यम्सनचे सध्याचे वय ३२ सुरू असून अजूनही तो न्यूझीलंडकडून चार-पाच वर्षे तरी हमखास खेळू शकतो. त्यामुळे भविष्यात त्याच्या नावावर १० हजार धावा लागण्याची शक्यताही नाकारता येणार नाही आणि तसे जर झाले तर न्यूझीलंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला केन विल्यम्सन हा पहिला वहिला १० हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरू शकतो.

विल्यम्सन २०१४ पासूनच्या प्रत्येक वर्षात न्यूझीलंड संघासाठी कसोटीत ५० पेक्षा जास्त सरासरीने धावा काढतोय, हेसुद्धा खूप विशेष आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना केन विल्यम्सन सातत्याने धावा काढतोय. २०१९ला त्याने आठ कसोटीत ५१.४०च्या सरासरीने ५१४ धावा काढल्या. त्यानंतर २०२०ला चार कसोटीत ८३ च्या सरासरीने ४९८ आणि २०२१ला पुन्हा चार कसोटीत खेळताना ६५.८३च्या सरासरीने ३९५ धावा काढल्या. तो कसोटीत किती गंभीर आहे हे त्याच्या या फॉर्मवरूनच लक्षात येते. आता न्यूझीलंड संघाला २ जूनपासून इंग्लंडमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळावे लागणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व केन विल्यम्सनकडेच कायम ठेवण्यात आले आहे. केन विल्यम्सनने एकूण ३८ कसोटीत न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले आहे. या ३८ कसोटीत न्यूझीलंडला २२ विजय आणि आठ पराभवांना सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडच्या कसोटी संघासाठी हे केन विल्यम्सनचे नेतृत्व सर्वोत्तम नेतृत्व मानले जाते.

न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटू स्टीफन फ्लेमिंग याने १९९७ ते २००६ या कालावधीत न्यूझीलंडच्या संघाचे ८० कसोटीत नेतृत्व केले होते. त्या नेतृत्वात न्यू्झीलंड संघाला २८ विजय आणि २७ पराभव पाहावे लागले होते. म्हणजे फ्लेमिंगच्या नेतृत्वाला ३५ टक्केच यश मिळवता आले होते; पण केन विल्यम्सनच्या कसोटी नेतृत्वाने आत्तापर्यंतच्या ३८ कसोटीतल्या आपल्या नेतृत्वात ५७ टक्के यश मिळवले आहे, म्हणूनच विल्यम्सनला न्यूझीलंड क्रिकेटमधला सध्याचा सर्वोत्तम क्रिकेटपटू मानले जात आहे. आता त्याच्या नेतृत्वाची नवी परीक्षा इंग्लंड दौऱ्यावर लागणार आहे. इंग्लंडमध्ये केनने यापूर्वी सहा कसोटी सामने खेळले असून त्यात त्याला ३२.९०च्या सरासरीने ३६२ धावाच काढता आल्या आहेत. कसोटी नेतृत्वात ३८ कसोटीत २२ विजय मिळवणे हे केव्हाही सर्वोत्तमच मानले जाईल. त्या ३८ कसोटीतल्या नेतृत्वावेळी खुद्द विल्यम्सननेही आपल्या संघाला ५९.९०च्या सरासरीने ३,२३५ धावांची मदत दिली आहे. नेतृत्वाचा दबाव त्याच्या फलंदाजीच्या आड कधीच आला नाही. शांतपणे मैदानावर वावरणाऱ्या केन विल्यम्सनकडे बरेच गुप्त प्लान असतात. तो त्याचा वापर मैदानावर असताना अगदी संयम ठेवून करत असतो. आता इंग्लंड दौऱ्यावरही तो आपले हेच गुण दाखवणार. दुसरे म्हणजे, एकेकाळचा त्याचा साथीदार ब्रेंडन मॅक्युल्लम हा आता इंग्लंड संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाची काही गुपिते इंग्लंड संघाला ब्रेंडनच्या माध्यमाने कळू शकणार आहेत, म्हणूनच कर्णधार केन विल्यम्सनला आपल्या नव्या आयडियांसहीत यावेळेस मैदानावर उतरावे लागणार आहे. केन विल्यम्सनच्या नेतृत्वासमोर हेच नवे आव्हान आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in