खलिद जामिल भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक; १३ वर्षांनी प्रथमच एका भारतीयाकडे प्रशिक्षकपदाची धुरा

भारताच्या ४८ वर्षीय खलिद जामिल यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. २०१२ नंतर प्रथमच एखादा भारतीय व्यक्तीच आपल्या फुटबॉल संघाला मार्गदर्शन करणार आहे.
खलिद जामिल भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक; १३ वर्षांनी प्रथमच एका भारतीयाकडे प्रशिक्षकपदाची धुरा
Published on

नवी दिल्ली : भारताच्या ४८ वर्षीय खलिद जामिल यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. २०१२नंतर प्रथमच एखादा भारतीय व्यक्तीच आपल्या फुटबॉल संघाला मार्गदर्शन करणार आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना जुलै महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा देण्यात भाग पाडण्यात आले. त्यानंतर एआयएफएफने अर्जांसाठी मागणी केली होती. त्यामध्ये झावीसह भारताचे यापूर्वीचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन, स्लोव्हाकियाचे स्टीफन तार्कोव्हिच व भारताचे खलिद जामिल यांचे अर्ज आढळले.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाशी केलेल्या चर्चेनंतर आपली सहमतीने मार्क्वेझ यांनी राजीनामा दिला होता. भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषकाला पात्र ठरण्यापासून फार दूर आहे. तसेच सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतर भारताची अवस्था आणखी बिकट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय फुटबॉल संघाला विश्वचषकाच्या पात्रता फेरीतही चांगली कामगिरी करता आलेली नाही. तसेच आशियाई स्पर्धांमध्येही भारतीय संघ पिछाडीवर पडत आहे. कराराचे एक वर्ष बाकी असतानाच मार्क्वेझ यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

जून २०२४मध्ये मानोलो यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. आधी ते इंडियन सुपर लीगमध्ये गोवा संघाला मार्गदर्शन करायचे. मानोलो यांना दोन वर्षांसाठी प्रशिक्षकपदाचा करार देण्यात आला होता. मात्र १० जून रोजी एएफसी एशियन कप स्पर्धेत भारताला क्रमवारीत आपल्यापेक्षाही खाली असलेल्या हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला. तसेच मानोलो यांच्या कार्यकाळात भारताला ८ पैकी फक्त १ सामना जिंकता आला. अनेक सामन्यांत तर भारताला एकही गोल झळकावता आला नाही. म्हणून छेत्रीलासुद्धा निवृत्ती मागे घेत पुन्हा खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. तरीही भारताची सुमार कामगिरी सुरूच राहिली.

त्यांनतर स्पेनचा दिग्गज फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक झावी हर्नांडेझने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र नंतर हे प्रकरण खोटे असल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, भारताकडून १९९८ ते २००६ या काळात ४० सामने खेळलेल्या जामिल यांनी आय लीगमध्ये अैझ्वाल फुटबॉल क्लबला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच सॅविओ मडेरा यांनी २०१२मध्ये भारताचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्यानंतर प्रथमच जामिल यांच्या रूपात भारतीय प्रशिक्षक आपल्या संघाला लाभला आहे. जामिल यांनी आयएसएलमध्ये जमशेदपूर एफसी संघालाही मार्गदर्शन केले होते. त्यामुळे एआयएफएफने त्यांच्यावर यंदा विश्वास दर्शवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in