सात्त्विक-चिराग यांना खेलरत्न; शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार

मुंबईकर चिराग आणि आंध्रप्रदेशच्या सात्त्विकने २०२३ या वर्षात आशियाई सुवर्ण जिंकण्यासह एकंदर चार स्पर्धांचे विजेतेपद मिळवले.
सात्त्विक-चिराग यांना खेलरत्न; शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार
PM

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा व अग्रगण्य पुरस्कार म्हणून ‘खेलरत्न’ची ओळख आहे. ९ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

त्याशिवाय एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यासह एकूण २६ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा तिरंदाज अदिती स्वामी आणि ओजस देवतळे यांचाही समावेश आहे.

मुंबईकर चिराग आणि आंध्रप्रदेशच्या सात्त्विकने २०२३ या वर्षात आशियाई सुवर्ण जिंकण्यासह एकंदर चार स्पर्धांचे विजेतेपद मिळवले. तसेच त्यांनी गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, तर जागतिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. ऑक्टोबरमध्ये त्यांनी जागतिक क्रमवारीत अग्रस्थान काबिज करून इतिहास रचला होता.

logo
marathi.freepressjournal.in