चेन्नई : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सोमवारी तब्बल १८ पदकांची लयलूट केली. जलतरणात ८, कुस्ती व टेबल टेनिसमध्ये ४, तर वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राने दोन पदके जिंकली. त्यामुळे महाराष्ट्राने गटातील अग्रस्थान कायम राखले आहे.
जलतरणात मुलांच्या ५० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत ऋषभ दास हा विजेतेपदाचा मानकरी ठरला. त्याने ही शर्यत २६.४९ सेकंदात पूर्ण केली. पाठोपाठ त्याने १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ५२.०६ सेकंदात जिंकली. त्याने श्लोक खोपडे, सलील भागवत व रोनक सावंत यांच्या साथीत चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीतही सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांना ही शर्यत जिंकण्यासाठी ३ मिनिटे ५६.९९ सेकंद वेळ लागला.
महाराष्ट्राच्या ऋजुता राजाज्ञ हिने ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर ३१.०४ सेकंदात पार केले होते. पुण्याच्या या खेळाडूने रविवारी पन्नास मीटर बटरफ्लाय शर्यतीतही विजेतेपद मिळविले होते. सलील भागवत याने १०० मीटर्स बटरफ्लाय शर्यत ५६.८५ सेकंदात पार करीत रौप्यपदक पटकाविले. ४०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या रोनक सावंत याला कांस्यपदक मिळाले त्याला हे अंतर पार करण्यासाठी चार मिनिटे ६.७२ सेकंद वेळ लागला.
मुलींच्या १०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या अलिफिया धनसुरा हिने रुपेरी कामगिरी केली. तिला हे अंतर पार करण्यासाठी ५९.९८ सेकंद वेळ लागला. ४०० मीटर्स वैयक्तिक मिळाले शर्यतीत महाराष्ट्राची राघवी रामानुजन हिला कांस्यपदक मिळाले. तिने ही शर्यत पाच मिनिटे २३.८० सेकंदात पूर्ण केली. महाराष्ट्राने साेमवारी दिवसभरात चार सुवर्ण, दोन रौप्य व दोन कास्य अशी आठ पदकांची कमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये अंकुर तिवारी याने १०२ किलो वजनी गटात तर सानिध्य मोरे याने ८९ किलो गटात रौप्य पदक जिंकले. अंकुर याने १०२ किलो गटात स्नॅचमध्ये १२४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १५५ किलो असे एकूण २७९ किलो वजन उचलले. सानिध्य याने ८९ किलो गटाच्या स्नॅचमध्ये १३५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १५६ किलो असे एकूण २९१ किलो वजन उचलले.
खो-खोमध्ये दोन्ही संघ अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कर्नाटक संघाचा २९-२३ असा एक डाव सहा गुणांनी पराभव केला. त्याचे श्रेय भरतसिंह वसावे (२ मिनिटे) अजय कश्यप (२.२० मिनिटे), चेतन बिका (४ गडी) यांना जाते. मुलींच्या गटात महाराष्ट्राने गुजरातवर २७-१६ एक डाव ११ गुणांनी विजय नोंदवला. महाराष्ट्राकडून सानिका चाफे (१.५५ मिनिटे), संध्या सुरवसे (२ मिनिटे), संपदा मोरे (३ गडी) यांनी छाप पाडली.