खेलो इंडिया: खो-खोमध्ये महाराष्ट्राला पाचव्यांदा दुहेरी मुकुट, राज्यातील क्रीडापटूंची पदक लयलूट सुरूच

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी मुला आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.
खेलो इंडिया: खो-खोमध्ये महाराष्ट्राला पाचव्यांदा दुहेरी मुकुट, राज्यातील क्रीडापटूंची पदक लयलूट सुरूच

चेन्नई : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी मुला आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. तसेच टेबल टेनिसमध्येही महाराष्ट्राने पदकांची लयलूट कायम राखली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने पदकतालिकेतील अग्रस्थान भक्कम केले आहे. महाराष्ट्राने तब्बल पाचव्यांदा दुहेरी मुकुट पटकावला, हे विशेष.

मदुराई येथील एसडीएटी जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राने अंतिम फेरीत ओदिशावर ३३-२४ असे ९ गुण व ३.३० मिनिटांच्या फरकाने वर्चस्व गाजवले. अश्विनी शिंदे (२.४५ मिनिटे संरक्षण), प्रीती काळे (२.१० मि.), संध्या सुरवसे (२ मि.) यांनी संरक्षणात, तर दीपाली राठोड (३ गडी), सुहानी धोत्रे (६ गडी) यांनी आक्रमणात कमाल केली. ओदिशाकडून स्मरणिकाने (६ गडी) एकाकी झुंज दिली.

मुलांच्या गटातील अंतिम लढतीत महाराष्ट्राने दिल्लीचा ४०-३० असा १० गुण व ४ मिनिटे राखून पराभव केला. रामचंद्र झोरे व भरतसिंग वसावे यांनी आक्रमणात अनुक्रमे ७ व ४ गडी टिपले. त्यांना संरक्षणात गणेश बोरेकर (२.१० मिनिटे), चेतन बिका (२ मि.) यांची उत्तम साथ लाभली. दिल्लीकडून दिपेंद्रने (१.१० मि.) चांगला खेळ केला.

महाराष्ट्राच्या खो-खो संघांना राजेंद्र साप्ते, नरेंद्र मेंगळ, पंकज चवंडे, मनीषा मानकर, प्रीती करवा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच व्यवस्थापकीय व सहाय्यक चमूमध्ये प्रियांका मोरे, कविता घाणेकर, सुप्रिया गाढवे, गुरुदत्त चव्हाण यांचा समावेश होता. महाराष्ट्राने या स्पर्धेत १५०हून अधिक पदके कमावली आहेत.

टेबस टेनिसमध्ये दोन सुवर्ण

महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर आणि सायली वाणी यांच्या जोडीने टेबल टेनिसमधील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्याच तनिशा कोटेचा व रिशा मीरचंदानी यांना ६-११, ११-७, ११-९, ११-६ असे पिछाडीवरून नमवून सुवर्णपदक काबिज केले. अंतिम लढतीत पराभूत झाल्याने तनिशा आणि रिशाला साहजिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याशिवाय मुलींच्या एकेरीत सायलीने पश्चिम बंगालच्या नंदिनी सहाला ८-११, ८-११, ६-११, ११-८, ११-६, ११-०, ११-६ असे पिछाडीवरून तब्बल ४-३ असे हरवत सुवर्ण यश मिळवले. याव्यतिरिक्त पृथाने एकेरीत उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने कांस्यपदक कमावले. सायलीनेच पृथ्वीला उपांत्य सामन्यात नमवले होते.

logo
marathi.freepressjournal.in