राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर

काही दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या निवड चाचणीतून १५-१५ खेळाडूंचे संघ जाहीर करण्यात आले आहेत
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर

अहमदाबाद, गुजरात येथे २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कलावधीत होणाऱ्या ३६व्या नॅशनल गेम्स २०२२ म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी खो-खो प्रकारातील महाराष्ट्राचे दोन संघ गुरुवारी जाहीर करण्यात आले. पुरुषांमध्ये मुंबई उपनगरच्या ॠषिकेश मुर्चावडेची, तर महिलांमध्ये ठाण्याच्या शीतल भोरची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या खो-खो संघाची घोषणा सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी केली. काही दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या निवड चाचणीतून १५-१५ खेळाडूंचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक केली होती. पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून पुण्याचे शिरिन गोडबोले, व्यवस्थापक कमलाकर कोळी, तर फिजिओ म्हणून डॉ. अमित रावटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिलांच्या संघासाठी प्रशिक्षकपदी उस्मानाबादचे प्रवीण बागल, सहाय्यक प्रशिक्षक प्राची वाईकर आणि व्यवस्थापक रत्नराणी कोळी यांची निवड झाली आहे.

संघात निवड झालेल्या खेळांडूचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्‍यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in