
ऋषिकेश बामणे/मुंबई
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील शुक्रवारचा दिवस भारतासाठी दुहेरी शतकांचा ठरला. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी बांगलादेशचा १०९-१४ असा तब्बल ९५ गुणांच्या फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर प्रतीक वाईकरच्या नेतृत्वात भारतीय पुरुषांनी श्रीलंकेचा १००-४० असा ६० गुणांच्या फरकाने फडशा पाडला. या धडाकेबाज विजयांसह भारताच्या दोन्ही संघांनी थाटात उपांत्य फेरी गाठली. शनिवारी दोन्ही संघांची दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडणार आहे.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर गेल्या पाच दिवसांपासून खो-खो विश्वचषक सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय महिलांनी साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकण्याची किमया साधली होती. तिन्ही लढतींमध्ये भारताने शतकी गुणसंख्या नोंदवताना अनुक्रमे दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियाला धूळ चारली. त्यानंतर शुक्रवारी उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय महिलांनी बांगलादेशलाही नेस्तनाबूत केले. महाराष्ट्राच्याच अश्विनी शिंदेने सामन्यात मोलाची भूमिका बजावली. तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच रेश्मा राठोड, मगई माझी यांनीही सुरेख योगदान दिले. शनिवारी त्यांची उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडेल.
पुरुष गटात भारताने साखळीत सलग चार सामने जिंकून अग्रस्थान काबिज केले होते. त्यांनी अनुक्रमे नेपाळ, ब्राझील, पेरू आणि भूतान यांना नमवले. मात्र शुक्रवारी उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय पुरुषांनी प्रथमच शतकी गुणसंख्या नोंदवताना श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सोलापूरचा रामजी कश्यप, वी. सुब्रमण्यम यांनी अफलातून खेळ केला. तसेच प्रतीक, अनिकेत पोटे, सुयश गरगटे या महाराष्ट्रातील खेळाडूंनीही चमक दाखवली. आता शनिवारी भारतीय पुरुषांसमोरही दक्षिण आफ्रिकेचेच आव्हान असेल.