
ऋषिकेश बामणे/मुंबई
पहिल्यावहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेसाठी भारताचा पुरुष आणि महिला संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताची धुरा महाराष्ट्रातील खेळाडूंच्या खांद्यावर असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारपदी महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड करण्यात आली असून प्रशिक्षकही महाराष्ट्राचेच आहेत. पुण्याचा अनुभवी प्रतीक वाईकर व पुण्याचीच प्रियंका इंगळे अनुक्रमे भारताच्या पुरुष आणि महिला संघाचे कर्णधारपद भूषवणार आहेत.
महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेण्यासाठी सज्ज आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मॅटवर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारतीय खो-खो महासंघ (केकेएफआय) या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून गुरुवारी महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनीच दोन्ही संघांची घोषणा केली. ६ खंडांतील २३ देशांत ही स्पर्धा रंगणार आहे. त्यापैकी पुरुष गटात २०, तर महिला गटात १९ असे एकंदर ३९ संघ स्पर्धेत सहभागी होतील.
गेल्या काही वर्षांपासून खो-खो झपाट्याने भरारी घेत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो-खो स्पर्धांना नेहमीच दर्दी क्रीडाप्रेमी गर्दी करतात. त्यानंतर अनुक्रमे पुणे आणि ओदिशा येथे झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगच्या दोन पर्वांनाही चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केकेएफआयने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केली. त्यानंतर मागील काही दिवस देशभरातील निवडक खेळाडूंचे दिल्ली येथे शिबीर घेण्यात आले. या शिबिरातील कामगिरीच्या आधारे भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. ७ दिवस होणाऱ्या या स्पर्धेचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल. २०३२च्या ऑलिम्पिकमध्ये खो-खोचा समावेश व्हावा, या हेतूने विश्वचषक आयोजनाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारत-नेपाळ या पुरुष गटातील लढतीद्वारे १३ जानेवारीपासून स्पर्धेला प्रारंभ होईल.
एकलव्य पुरस्कार विजेत्या प्रतीकने वयाच्या आठव्या वर्षी खो-खो खेळण्यास सुरुवात केली. संगणक विज्ञान आणि वित्त या विषयात त्याने पदवी प्राप्त केली असूनही, त्याने व्यावसायिकरित्या खो-खो खेळला आहे आणि क्रीडा कोट्यातून नोकरी मिळविली आहे. अल्टिमेट खो-खो लीगमध्ये त्याने तेलुगू योद्धाज संघाचे नेतृत्व करताना उपविजेतेपद मिळवले होते. तसेच ५६व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
दुसरीकडे पुण्यातील राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाची शिष्य असलेली प्रियंकासुद्धा राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली आहे. अविनाश करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी घेणाऱ्या प्रियंकाने आतापर्यंत २३ राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या प्रियंकाला यंदा प्रथमच देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. शासकीय नोकरी करत असलेल्या प्रियंकाने जवळपास सर्वच वयोगटांतील स्पर्धेत छाप पाडत इथवर मजल मारली आहे.
दरम्यान, पुरुष संघाला सुमित भाटिया यांचे प्रशिक्षण लाभणार आहे. तसेच शिरीन गोडबोलेसुद्धा या संघासह असतील. महिला संघाला अश्वनी कुमार मार्गदर्शन करणार असून प्राची वाईकरही त्यांच्या मदतीला असणार आहेत. भारतीय महिला संघ १४ तारखेला दक्षिण कोरियाविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. त्यामुळे सर्वांचे स्पर्धेकडे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्राचे अष्टक भारतीय संघात
भारताच्या दोन्ही खो-खो संघांत मिळून महाराष्ट्रातील एकूण आठ खेळाडूंचा समावेश आहे. यांपैकी पुरुष संघात कर्णधार प्रतीक, सुयग गरगटे, आदित्य गणपुले, रामजी कश्यप आणि अनिकेत पोटे हे पाच खो-खोपटू आहेत. प्रतीक, सुयश व आदित्य हे तिघेही पुण्याचे खेळाडू आहेत. रामजी हा सोलापूरचा, तर अनिकेत मुंबई उपनगरचा खेळाडू आहे. महिला संघात महाराष्ट्राच्या प्रियंका, रेश्मा राठोड आणि अश्विनी शिंदे यांचा समावेश आहे. प्रियंका पुण्याची, अश्विनी धाराशिवची, तर रेश्मा ठाण्याची खेळाडू आहे.
राज्य शासनाकडून १० कोटींचा निधी
महाराष्ट्र राज्य शासनाने खो-खो विश्वचषकासाठी १० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य क्रीडा परिषदेकडून हा निधी देण्यात येईल. भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांना स्पर्धेचे निमंत्रण देण्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानुसार विश्वचषकाच्या प्रायोजकत्वासाठी विशेष बाब म्हणून हा निधी पुरवण्यात येईल.
गेल्या २४ वर्षांपासून मी खो-खो खेळत आहे. मात्र विश्वचषकात भारताचे नेतृत्व करण्याची संधी लाभेल, असा विचारही कधी केला नव्हता. ज्यावेळी कर्णधार म्हणून माझे नाव जाहीर करण्यात आले, तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.
- प्रतीक वाईकर, भारताचा कर्णधार
पहिल्याच खो-खो विश्वचषकात भारताचे नेतृत्व करण्याची संधी लाभल्याने मी फार आनंदी आहे. आई-वडील आणि प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे मी इथवर मजल मारली आहे. माझ्यावर सर्वांनी विश्वास दर्शवला आहे. त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवून देशाला विश्वचषक जिंकवून देईन.
- प्रियंका इंगळे, भारताची कर्णधार
प्रियंकाने आमच्या मंडळाचेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. तिला विश्वचषकासाठी शुभेच्छा. प्रियंकामुळे राज्यासह देशातील अनेक खेळाडूंना खो-खोकडे वळण्याची प्रेरणा मिळेल. प्रियंकासारख्या आणखी खेळाडू घडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
- अविनाश करवंदे, प्रियंकाचे प्रशिक्षक