
ऋषिकेश बामणे/नवी दिल्ली
खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाला सोमवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दणक्यात प्रारंभ झाला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी कर्णधार प्रतीक वाईकरने भारतीय पथकाचे नेतृत्व केले.
भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या. तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी, सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनीही हजेरी लावली. स्पर्धेतील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी उद्घाटन प्रसंगी संचालनात भाग घेतला. संचालनात भारतीय महिला खेळाडूंनी साडी परिधान करून आपल्या देशाची परंपरा व संस्कृती जपली. यावेळी भारतीय पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर व महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे यांनी शपथ घेतली.
उद्घाटन सोहळ्यामुळे सामन्याला विलंब
सात वाजता सुरू झालेला शानदार उद्घाटन सोहळा जवळपास दोन तासांपर्यंत रंगला. मात्र यामुळे पहिला सामना सुरू होण्यास विलंब झाला. निर्धारित वेळेनुसार साडेआठ वाजता भारत विरुद्ध नेपाळ यांच्यातील लढत सुरू होणे अपेक्षित होते. मात्र साडेनऊच्या सुमारास ही लढत सुरू झाली. तरीही चाहत्यांमध्ये मात्र उत्साह कायम होता. भारतीय महिला संघ मंगळवारी त्यांच्या अभियानास प्रारंभ करणार आहेत.
भारताची संघर्षपूर्ण सलामी
स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागला. रात्री सव्वा दहापर्यंत रंगलेल्या पहिल्या लढतीत भारताने नेपाळला ४२-३७ असे अवघ्या पाच गुणांच्या फरकाने नमवले. मध्यंतराला भारताकडे २४-२० अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात मात्र नेपाळने कडवी झुंज दिली. मार्च २०२४ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत नेपाळने भारताला अंतिम फेरीत विजयासाठी झुंजवले होते. त्याचीच काहीशी आठवण या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा आली.