
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष आणि महिला संघाने रविवारी पहिला खो-खो विश्वचषक जिंकला. महिला संघाने नेपाळचा ७८-४० च्या मोठ्या फरकाने पराभव केला, तर पुरुष संघाने नेपाळला ५४-३६ च्या फरकाने हरवले. दोन्ही भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिले. नेपाळच्या दोन्ही संघांना भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
अखेर खो-खो या खेळात भारतच महासत्ता असल्याचे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताने दुहेरी विश्वविजेतेपद काबिज करण्याची किमया साधली. भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी स्पर्धेत अखेरपर्यंत अपराजित राहताना अंतिम सामन्यात नेपाळवर दुहेरी वर्चस्व गाजवले. प्रतीक वाईकर आणि प्रियंका इंगळे या पुण्यातील खो-खोपटूंच्या नेतृत्वात भारताने हे यश साध्य केले.
महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून खो-खो झपाट्याने भरारी घेत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो-खो स्पर्धांना दर्दी क्रीडाप्रेमी नेहमीच गर्दी करतात. त्यानंतर अनुक्रमे पुणे आणि ओदिशा येथे मॅटवर झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगच्या दोन पर्वांनाही चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केकेएफआयने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केली. गेला आठवडाभर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या विश्वचषकात एकंदर सहा खंडांतील २३ देश सहभागी झाले होते. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून ३९ संघांत ही स्पर्धा खेळवण्यात आली.
या स्पर्धेत भारतीय महिलांनी साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकण्याची किमया साधली होती. तिन्ही लढतींमध्ये भारताने शतकी गुणसंख्या नोंदवताना अनुक्रमे दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियाला धूळ चारली.
महिला सामन्याचे पुरस्कार
सर्वोत्तम आक्रमक खेळाडू : अंशू कुमारी (भारत)
सर्वोत्तम संरक्षक : मनमती धानी (नेपाळ)
सर्वोत्कृष्ट खेळाडू : चैत्रा बी (भारत)
पुरुष सामन्याचे पुरस्कार
सर्वोत्तम आक्रमक खेळाडू : सुयश गरगटे (भारत)
सर्वोत्तम संरक्षक : रोहित बर्मा (नेपाळ)
सर्वोत्कृष्ट खेळाडू : मेहुल (भारत)
सुवर्णपदक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी २ कोटी २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच थेट क्लास वन अधिकारी म्हणून नोकरीदेखील राज्य शासनाच्या वतीने दिली जाणार आहे. भारताच्या पुरुष संघात महाराष्ट्रातील पाच, तसेच महिला संघात राज्यातील तीन खेळाडूंचा समावेश आहे.
- चंद्रजीत जाधव, सहसचिव, भारतीय खो-खो महासंघ
आजचा दिवस केवळ माझ्या काराकीर्दीतलाच नाही, तर भारतीय खो-खोच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. हा विजय आमच्या संघाच्या अथक मेहनतीचा, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या पाठिंब्याचा परिणाम आहे. नेपाळ आम्हाला कडवी झुंज देईल, हे ठाऊक होते. मात्र आम्ही आमचे सर्वस्व झोकून दिले. तरुण पिढीला एकच सांगू इच्छितो की तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा. मेहनत, जिद्द आणि शिस्त यांचे महत्त्व कधीच कमी होत नाही. भारतीय खेळाडू कुठल्याही स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, असा संदेश या विजयाने दिला आहे.
- प्रतीक वाईकर, कर्णधार, भारतीय पुरुष संघ
खो-खो हा खेळ आपल्या परंपरेशी जोडलेला आहे. आज या परंपरेला जागतिक पटलावर नेण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हा विजय केवळ आमचा नाही; तो संपूर्ण भारताचा आहे. ज्याने आम्हाला पाठिंबा दिला, विश्वास दाखवला आणि आमच्यावर प्रेम केले त्या प्रत्येकाचा हा विजय आहे. खो-खो महासंघाचे मी विशेष आभार मानते तसेच प्रत्येक मुलीला आणि महिलेला तिच्यातील कर्तृत्व दाखवण्याचे आवाहन करते.
- प्रियंका इंगळे, कर्णधार, भारतीय महिला संघ