आता २०२७मध्ये इंग्लंडला रंगणार विश्वचषक खो-खो स्पर्धा; दर २ वर्षांनी स्पर्धेचे आयोजन

विश्वचषक खो-खो स्पर्धेचा पहिला हंगाम नुकताच नवी दिल्ली येथे दणक्यात पार पडला. आता दोन वर्षांनी म्हणजेच २०२७मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे पुढील विश्वचषक खेळवण्यात येईल, अशी घोषणा भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी केली.
आता २०२७मध्ये इंग्लंडला रंगणार विश्वचषक खो-खो स्पर्धा; दर २ वर्षांनी स्पर्धेचे आयोजन
एक्स @SudhanshuBJP
Published on

मुंबई : विश्वचषक खो-खो स्पर्धेचा पहिला हंगाम नुकताच नवी दिल्ली येथे दणक्यात पार पडला. आता दोन वर्षांनी म्हणजेच २०२७मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे पुढील विश्वचषक खेळवण्यात येईल, अशी घोषणा भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी केली.

महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून खो-खो झपाट्याने भरारी घेत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो-खो स्पर्धांना दर्दी क्रीडाप्रेमी नेहमीच गर्दी करतात. त्यानंतर अनुक्रमे पुणे आणि ओदिशा येथे मॅटवर झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगच्या दोन पर्वांनाही चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केकेएफआयने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केली. गेला आठवडाभर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषकाचा दुहेरी थरार पार पडला. या विश्वचषकात एकंदर सहा खंडांतील २३ देश सहभागी झाले होते. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून ३९ संघांत ही स्पर्धा खेळवण्यात आली. भारताने दुहेरी जेतेपद मिळवताना अंतिम फेरीत नेपाळवर वर्चस्व गाजवले.

पुणेकर प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात पहिल्या विश्वचषकात भारतीय महिलांनी साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकण्याची किमया साधली होती. तिन्ही लढतींमध्ये भारताने शतकी गुणसंख्या नोंदवताना अनुक्रमे दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियाला धूळ चारली. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय महिलांनी बांगलादेशला नेस्तनाबूत केले. मग महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर प्रभुत्व मिळवले. अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ७८-४० असा ३८ गुणांच्या फरकाने धुव्वा उडवला.

दुसरीकडे पुण्याच्याच प्रतीक वाईकरच्या नेतृत्वाखाली भारताने साखळीत सलग चार सामने जिंकून अग्रस्थान काबिज केले होते. त्यांनी अनुक्रमे नेपाळ, ब्राझील, पेरू आणि भूतान यांना नमवले. उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय पुरुषांनी प्रथमच शतकी गुणसंख्या नोंदवताना श्रीलंकेचा धुव्वा उडवला. शनिवारी त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर मात केली. मग महाअंतिम मुकाबल्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी नेपाळला ५४-३६ असे १८ गुणांच्या फरकाने नमवले.

दरम्यान, भारताच्या जेतेपदानंतर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी मित्तल यांच्यासह महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी, आंतरराष्ट्रीय महासंघाचे सचिव रोहित हल्दानिया उपस्थित होते. यावेळी दोन्ही कर्णधारांनी महासंघाला विश्वचषक सुपूर्द केला. दोन्ही संघांचे प्रशिक्षकही यावेळी उपस्थित होते. परिषदेतच मित्तल यांनी पुढील विश्वचषकाचे यजमान इंग्लंड भूषवेल आणि ही स्पर्धा आणखी जल्लोषात आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे सगळीकडे सध्या खो-खोचीच चर्चा सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in