
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांनी बुधवारी भारताच्या दोन्ही विश्वविजेत्या खो-खो संघांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. विश्वचषकातील यशानंतर आता खो-खो राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील समावेशासाठी सज्ज असल्याचे यावेळी मांडविया म्हणाले.
महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून खो-खो झपाट्याने भरारी घेत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो-खो स्पर्धांना दर्दी क्रीडाप्रेमी नेहमीच गर्दी करतात. त्यानंतर अनुक्रमे पुणे आणि ओदिशा येथे मॅटवर झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगच्या दोन पर्वांनाही चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केकेएफआयने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केली. गेला आठवडाभर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषकाचा दुहेरी थरार पार पडला. या विश्वचषकात एकंदर सहा खंडांतील २३ देश सहभागी झाले होते. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून ३९ संघांत ही स्पर्धा खेळवण्यात आली. भारताने दुहेरी जेतेपद मिळवताना अंतिम फेरीत नेपाळवर वर्चस्व गाजवले.
दरम्यान, भारताचे खो-खो संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटणार असल्याचे समजते. याविषयी अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच २०३०चे आशियाई आणि २०३२च्या ऑलिम्पिकमध्ये खो-खोचा समावेश करण्यासाठी भारतीय महासंघ प्रयत्नशील आहे, असे महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी जाहीर केले. २०२७मध्ये पुढील विश्वचषक इंग्लंडला रंगणार आहे.