सप्टेंबरमध्ये खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचा थरार रंगण्याची शक्यता

पुढील आठवड्यात पंजाब येथे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्येच अल्टिमेट लीगसह विश्वचषकाच्या तारखांविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
सप्टेंबरमध्ये खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचा थरार रंगण्याची शक्यता

यंदाच्या वर्षातील आगामी तीन महिने खो-खोप्रेमींसाठी मनोरंजनाने परिपूर्ण असतील. एकीकडे ऑगस्ट महिन्यात भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली अथवा अजमेर येथे खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचा थरार रंगण्याची शक्यता आहे.

भारतीय खो-खो महासंघाचे (केकेएफआय) सरचिटणीस महेंद्रसिंह त्यागी आणि सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी याविषयी अधिकृत माहिती दिली असून अल्टिमेट लीगच्या आयोजनाची तयारीसुद्धा वेगात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात पंजाब येथे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्येच अल्टिमेट लीगसह विश्वचषकाच्या तारखांविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल. गतवर्षी डिसेंबरमध्ये राजस्थान खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष असगर अली यांनी मार्च २०२२मध्ये बाडमेरमध्ये विश्वचषक खेळवण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु विविध कारणांनी विश्वचषक लांबणीवर पडला.

दरम्यान, विश्वचषकात प्रत्येकी २० पुरुष आणि महिला संघांचा समावेश असेल. अल्टिमेट लीगप्रमाणेच विश्वचषकसुद्धा मॅटवर पायात बूट घालून खेळवण्यात येईल. २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खोचा समावेश करण्यात यावा, यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. त्यामुळे यंदा विश्वचषकापूर्वी खो-खोची आशियाई अजिंक्यपद स्पर्धा खेळवून असंख्य चाहत्यांना खेळाकडे आकर्षित करण्याचा महासंघाचा मानस आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in