खोदा पहाड, निकला चुहा!

मेगा ब्लॉकबस्टर’च्या जाहिरातीत काही दिवसांपूर्वीच मुख्य कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला होता
खोदा पहाड, निकला चुहा!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोणती घोषणा करणार, याची त्यांच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच, त्याचे छायाचित्र असलेले ‘मेगा ब्लॉकबस्टर’ नावाचे पोस्टर हे ‘मीशो’ अॅपची जाहिरात असल्याचे उघड झाले. हा कोणताही चित्रपट नसून एका अॅपची जाहिरात असल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे रोहित चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या तर्कांना पूर्णविराम मिळाला असून ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी अनेकांची भावना झाली आहे. तथापि, यामुळे रोहित मनोरंजनसृष्टीशी मात्र जोडला गेला आहे.

‘मेगा ब्लॉकबस्टर’च्या जाहिरातीत काही दिवसांपूर्वीच मुख्य कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला होता. अॅपशी संबंधित मान्यवरांचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या ‘मेगा ब्लॉकबस्टर’बद्दल उत्सुकता वाढली होती. अखेर ‘मेगा ब्लॉकबस्टर’मागील गुपित उघड झाले. याआधी हा एक चित्रपट असल्याचा बोलबोला झाला होता. पोस्टरचे एका चित्रपटाप्रमाणे प्रमोशन करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रश्मिका मंदाना, कॉमेडीयन कपिल शर्मा आणि या रोहित शर्मा यांचे लूक्स रिलीज करण्यात आले होते. त्यापाठोपाठ या ‘मेगा ब्लॉकबस्टर’मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही एंट्री झाली होती. दीपिकाने सोशल मीडियावरून ही बातमी दिली होती. तिने या एक पोस्टर शेअर करत यातील तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. हे पोस्टर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये ‘सरप्राईज’ असे लिहिले. दीपिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या होत्या. प्रेक्षक दीपिकाला नव्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक झाले असल्याचे कमेंट्स करून सांगत होते. तसेच ‘मेगा ब्लॉकबस्टर’बद्दल अधिक माहिती विचारत होते. जिकडेतिकडे याच पोस्टरची चर्चा होत होती; पण आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या जाहिरातीत ‘मेगा ब्लॉकबस्टर’बद्दल पोस्ट टाकणारे सर्व कलाकार दिसत आहेत. रणवीर सिंग, सौरव गांगुली यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या सोशल मीडिया टीमने हे पोस्टर पोस्ट केले होते. तेव्हाच हा चित्रपट नसून एका ब्रँडची जाहिरात असल्याचे समोर आले होते. गांगुलीला ॲपच्या कंपनीने पाठविलेला मजकूर त्याच्या सोशल मीडिया टीमने जसाच्या तसा कॉपी करून त्याच्या पोस्टमध्ये टाकला होता. त्यात ठळक अक्षरांत लिहिले होते की, ‘मीशो ब्रँडचे नाव आणि हॅशटॅग पोस्टमध्ये अजिबात यायला नको;’ परंतु कॉपी पेस्टमुळे रहस्य तेव्हाच उलगडले होते. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ हा चित्रपट किंवा वेब सीरिज नसून एका अॅपचा प्रमोशनल व्हिडीओ असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. आपली चूक लक्षात आल्यावर गांगुलीच्या अकाउंटवरून ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती; परंतु डिलीट व्हायच्या आत ती पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि तेव्हाच हा चित्रपट नसून एक जाहिरात आहे हे उघड झाले होते. परंतु रोहित शर्माही ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा भाग असल्याने आणि यापूर्वी काही क्रिकेटपटूंनी चित्रपटात भूमिका केलेल्या असल्याने रोहितला एखादी भूमिका मिळाली असण्याची शक्यता दृढ होती; परंतु ‘खोदा पहाड, निकला चुहा’ अशीच रोहितच्या चाहत्यांची भावना झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in