

अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जी सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर बोल्ड ड्रेसिंग स्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या खुशीने भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल खळबळजनक दावा केला आहे. सूर्यकुमार यादव तिला सतत मेसेज करायचा, एवढंच नाही तर अनेक क्रिकेटपटूंनीही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता असे तिने सांगितले. खुशीच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
'सूर्यकुमार यादव मला सतत मेसेज करायचा...'
अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात खुशी पोहोचली होती. यावेळी माध्यमांनी तिला विचारले की, तुला कोणत्या क्रिकेटपटूला डेट करायला आवडेल? यावर उत्तर देताना खुशीने सूर्यकमार यादवबद्दल खळबळजनक खुलासा केला. खुशी म्हणाली, "मला कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करायचे नाही. अनेक क्रिकेटपटू माझ्या मागे लागले होते. पण, सूर्यकुमार यादव मला सतत मेसेज करायचा. मात्र, आता आमच्यात फार बोलणं होत नाही. मला कोणासोबतही माझे नाव जोडायचे नाही. खरंतर, मला स्वतःचं नाव कोणासोबत जोडणं पटत नाही. माझ्या नावासोबत पसरलेल्या कोणत्याही अफवा मला आवडत नाही, म्हणून मला लिंकअप करायचे नाही. " असे ती म्हणाली. तिच्या या मुलाखतीचा एक व्हिडिओही समोर आला असून नेटकरी तिच्या दाव्याबाबत आपआपली मते मांडत आहेत. मात्र, सूर्यकुमार यादवने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बोल्ड कंटेटमुळे चर्चेत
खुशी मुखर्जीचा जन्म २४ नोव्हेंबर १९९६ रोजी कोलकाता येथे झाला.तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने २०१३ मध्ये 'अंजली थुराई' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती 'डोंगा प्रेमा' आणि 'हार्ट अटॅक' सारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये दिसली. तिने 'श्रृंगार' सारख्या हिंदी चित्रपटामध्येही काम केले. परंतु, खुशीला खरी ओळख छोट्या पडद्यावर आणि रिअॅलिटी शोमधून मिळाली. एमटीव्हीच्या लोकप्रिय शो 'स्प्लिट्सव्हिला १०' आणि 'लव्ह स्कूल ३' मध्ये भाग घेतल्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली.तिने टीव्ही मालिका 'बालवीर रिटर्न्स' आणि 'नादान'मध्येही काम केले आहे.