

मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड याची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या महेला जयवर्धने यांनी मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर शनिवारी फ्रँचायझीने पोलार्डच्या नियुक्तीची घोषणा केली. आयपीएल २०२७ च्या हंगामापासून तो संघाची धुरा सांभाळणार आहे.
पोलार्ड गेल्या काही हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. आता मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याच्यासमोर संघाला पुन्हा विजेतेपद मिळवून देण्याचे मोठे आव्हान असेल. मुंबई इंडियन्सने अखेरचे आयपीएल विजेतेपद २०२० मध्ये पटकावले होते.
मुंबई इंडियन्सने म्हटले की, "खेळाडू ते प्रशिक्षक असा प्रदीर्घ प्रवास असलेल्या किरॉन पोलार्डला मुख्य प्रशिक्षकपदी बढती देताना आम्हाला आनंद होत आहे. संघाचा गौरवशाली वारसा पुढे नेणे, प्रतिभावान खेळाडू घडवणे, संघसंस्कृती मजबूत करणे आणि मैदानावर तसेच मैदानाबाहेर उत्कृष्ट कामगिरी करणे, या उद्दिष्टांप्रति असलेल्या आमच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब नियुक्तीतून दिसते." या मुंबई इंडियन्सला गेल्या पाच हंगामांत सातत्य राखता आलेले नाही. या कालावधीत संघाने कधी प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला, तर कधी तळाचे स्थान गाठले. "मुंबई इंडियन्स हा माझ्या आयुष्याचा आणि क्रिकेट कारकीर्दीचा मोठा भाग आहे. या संघाशी, खेळाडूंशी आणि 'पलटन'शी असलेले माझे नाते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडू आणि त्यानंतर प्रशिक्षक म्हणून या प्रवासाचा अनुभव घेतल्यामुळे येणाऱ्या जबाबदारीची मला जाणीव आहे," असे पोलार्डने सांगितले.
संघात बदल करणार नाही
संघात मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचा आपला विचार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. मुंबई इंडियन्सची विजेतेपदासाठी झटण्याची वृत्ती आणि जिंकण्याची जिद्द ही आपल्या स्वभावाचाच भाग असल्याचे त्याने सांगितले. "संघात फार बदल करण्याची गरज वाटत नाही. प्रत्येक वेळी जिंकण्याची इच्छा आणि त्यासाठी आवश्यक असलेली उत्कटता ही तुमच्यातच रुजलेली असते. माझ्या व्यक्तिमत्त्वात फारसा बदल होणार नाही. मैदानाच्या सीमारेषेपलीकडे खेळाडू म्हणून जशी जिद्द आणि आग माझ्यात होती, ती तशीच कायम राहील. फक्त आता मी मैदानापासून काहीसा दूर असेन," असे पोलार्डने नमूद केले.