किलर मिलर

24 मे २०२२ ला कोलकातामध्ये खेळलेल्या राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात डेविड मिलरने गुजरात टायटन्स संघासाठी जी स्फोटक फलंदाजी केली होती ती खरंच बघण्यासारखी होती. विजयासाठी १८९ धावांचं टार्गेट समोर असताना मिलरने कर्णधार हार्दिक पंड्याची साथ घेत ३८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षट‌्कार ठोकून नाबाद ६८ धावांची वादळी खेळी साकारली होती. खरंच तो त्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसाठी किलर मिलर ठरला होता. गुजरात टायटन्सने हा सामना ३ विकेटस‌्ने जिंकला.

दक्षिण आफ्रिकेचा ३३ वर्षीय डावखुरा फलंदाज डेविड मिलर हा आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिका संघाकडून एकही कसोटी खेळू शकलेला नाही; पण त्याला १४३ वनडे आणि ९५ टी-२० चे आंतरराष्ट्रीय सामने दक्षिण आफ्रिका संघाकडून जरूर खेळायला मिळाले आहेत. २०२२ च्या आयपीएलमध्ये त्याने गुजरात टायटन्स संघाला शानदार मदत केली आहे. त्याने या स्पर्धेत आत्तापर्यंत खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये ६४.१४ च्या सरासरीने ४४९ धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने यापूर्वी दोनवेळा ४०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. २०१३ च्या आयपीएल स्पर्धेत त्याने १२ सामन्यांमध्ये ५९.७१ च्या सरासरीने ४१८ धावा काढल्या होत्या. त्या सत्रात त्याने एक शतकसुद्धा ठोकलं होतं. २०१४ च्या आयपीएल स्पर्धेत पुन्हा मिलरने १६ सामन्यांमध्ये खेळताना ४४.६० च्या सरासरीने ४४६ धावा काढल्या. आता मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा २०२२ च्या आयपीएल स्पर्धेत मिलरने ४०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत हा मिलर फ्लॉप ठरला होता. त्यावेळी त्याने ९ सामन्यांमध्ये २४.८० च्या सरासरीने फक्त १२४ धावांचच योगदान दिलं हाेतं. यावेळेस मात्र तो गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना महत्वाची भूमिका बजावताना दिसतोय. त्याने १७ एप्रिल २०२२ च्या पुणे इथल्या सामन्यात चेन्नई संघाविरूद्ध खेळताना ५१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षट‌्कार ठोकत नाबाद ९४ धावांची दमदार खेळी केली हाेती. त्याच्या या वादळी खेळीमुळेच त्याच्या संघाला हा सामना ३ विकेटस‌्ने जिंकता आला होता. एकूणच आयपीएलमध्ये २०१२ पासून खेळणाऱ्या या डेविड मिलरने यात १०४ सामने खेळले असून त्यात त्याने ३६.७१ च्या सरासरीने २४२३ धावा काढल्या आहेत.

डेविड मिलर दक्षिण आफ्रिका संघाकडूनही टी-२०चे ९५ सामने खेळला असून त्यात त्याने ३१.८९ च्या सरासरीने १७८६ धावांचे योगदान दिले आहे. यात त्याने तीनवेळा प्लेयर आॅफ दि सिरीजचा किताब पटकावला आहे. २०२१ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिका संघाकडून १७ टी-२०च्या सामन्यांमध्ये खेळताना ४७ च्या सरासरीने ३७७ धावा जमवून आपला फॉर्म दाखवला होता. डावखुरा डेविड मिलर हा आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास ११ कर्णधारांच्या हाताखाली खेळला आहे. त्याच्या उपस्थितीत दक्षिण आफ्रिका संघाने ९५ टी-२०च्या सामन्यांमध्ये ५५ विजय मिळवले आहेत. या ५५ विजयात मिलरने आपल्या संघासाठी ४२.५८ च्या सरासरीने १०२२ धावांची शानदार साथ दिली आहे. आयपीएलच्या निमित्ताने डेविड मिलरला भारतीय वातावरणात यावेळेस भरपूर खेळायला मिळालं. अगदी गरमीच्या वातावरणातही त्याने स्वत:ला व्यवस्िथत अॅडजेस्ट करून आपला फाॅर्म दाखवला. दुसरं महत्वाचं म्हणजे ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेच्या टी-२०चा संघ भारतात ६ सामने खेळायला येणार आहे. खरं म्हणजे नेमका पावसाळा तोंडावर असताना हे आयोजन घाईगर्दीत का होत आहे कोण जाणे? पण डेविड मिलरला या मालिकेपूर्वी आयपीएलमध्ये टी-२०चा चांगला सराव करून घेता आला आहे.

मिलर भारतात आंतरराष्ट्रीय टी-२०चे फक्त ८ सामनेच यापूर्वी खेळला आहे. त्यात त्याने २५.३३ च्या सरासरीने फक्त ७६ धावाच काढल्या आहेत. मिलरकडे टी-२० सामन्यांचा अनुभव आता खूप वाढला आहे. दक्षिण आफ्रिका संघाबरोबरच तो इतरही अनेक संघांकडून टी-२०चे सामने खेळला आहे. ३७६ सामन्यांमध्ये त्याने ३४२ डावात फलंदाजी करताना त्यात ३६.१६ च्या सरासरीने आणि ३ शतकांच्या मदतीने ८३१७ धावा आपल्या खात्यात जोडल्या आहेत. या दीर्घ अनुभवाचा फायदा त्याला आता यावेळच्या आयपीएल स्पर्धेत करून घेता आला आहे. ज्या गुजरात टायटन्स संघाकडून तो यावेळच्या आयपीएल स्पर्धेत खेळतोय तोच गुजरात टायटन्सचा संघ या स्पर्धेत सध्या नंबर वनला पोहोचला आहे. फायलनच्या सामन्यात काय होईल तो भाग वेगळा; ण गुजरात टायटन्स संघाने आयपीएल स्पर्धेतल्या पहिल्याच प्रवेशात सगळ्यांनाच मोठा धक्का दिला एवढं मात्र खरं. यात डेविड मिलरच्या कामगिरीचा वाटाही खूप मोठा आणि महत्वाचा मानला जाणं साहजिकच आहे. तो या स्पर्धेत खरा किलर मिलर ठरला.

त्याने १५ सामन्यांमध्ये एकूण २९ चौकार आणि २२ षट‌्कार ठोकले. हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स संघाला या ‘िकलर मिलर’ची सर्वोत्तम साथ मिळाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in